माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण' पुरस्कार जाहीर. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सन्मान. ...
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण' पुरस्कार जाहीर.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सन्मान.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करणाऱ्या 'जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन', पुणे यांच्या वतीने यंदाचा प्रतिष्ठेचा 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार २०२६' राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार सोहळा सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता येथे दिमाखात पार पडणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दिलीपराव देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पवार भूषवणार आहेत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे आहेत.
या सोहळ्याला राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार भीमराव तापकीर, अतुल बाबा भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष अॅड. सौरभ अंकलकोटे पाटील, जय वैभवलक्ष्मी फौंडेशनचे विश्वस्त डॉ. शंतिकांत पागे, डॉ. स्वरूप एकलुरे आणि अॅड. मिथुन गुरव यांची विशेष उपस्थिती असणार आहे. जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा लाभली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेतृत्वाने सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली. त्याच परंपरेत लातूरचे सुपुत्र व राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दूरदृष्टी, धाडसी निर्णयक्षमतेच्या बळावर शेतकरी-कामगारांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग योगदानाची दखल घेऊन त्यांना 'सहकार भूषण' पुरस्काराने गौरविण्यात येत आहे, असे प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांनी सांगितले.
यापूर्वी जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनतर्फे कै. सिंधुताई सपकाळ, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे, श्रीमती कृष्णा कश्यप, अरुणाताई ढेरे, आणि डॉ. विनोद शहा यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन व ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

No comments