निंभोरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; ऐक्य आणि बंधुत्वाचा दिला संदेश [युवकांनी पेढे-मिठाई वाटून साजरा केला पैगंबरांचा प्रकटदिन] रावेर प...
निंभोरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; ऐक्य आणि बंधुत्वाचा दिला संदेश
[युवकांनी पेढे-मिठाई वाटून साजरा केला पैगंबरांचा प्रकटदिन]
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र पर्वानिमित्त रावेर तालुक्यातील निंभोरा गावात मंगळवारी मोहम्मद पैगंबर यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात धार्मिक उल्हास, ऐक्य आणि बंधुत्वाचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी मशिदीत विशेष प्रार्थनेनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. हात हिरवे झेंडे, बॅनर आणि पताका घेऊन युवकांनी "नारा-ए-तकबीर, या रसूल अल्लाह" च्या जयघोषात संपूर्ण मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली. यावेळी नाते पाक आणि धार्मिक गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीदरम्यान युवकांनी नागरिकांना पेढे आणि मिठाईचे वाटप केले. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवर्षाव करत या धार्मिक सोहळ्याचे स्वागत केले. यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले. या मिरवणुकीला केवळ धार्मिक महत्त्व नसून सामाजिक ऐक्याचा संदेशही देणारा कार्यक्रम ठरला. मशिदीचे मौलवी अली अजगर, मुतवली शरीफ खान यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामुळे गावातील धार्मिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निंभोरा पोलीस स्टेशनच्या स.पो.नि. मीरा देशमुख यांनी सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या उपस्थितीमुळे मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीची सांगता गावातील खाचणेवाडा येथील पीर साहेब ख्वाजा वली दर्गाहात विशेष दुआ करून करण्यात आली.

No comments