विद्यार्थ्यांच्या ‘सायबर राखी’तून डिजिटल सुरक्षेचा संदेश शब्बीर खान यावल/जळगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव : रक्षाबंधनाच्या निमित्त...
विद्यार्थ्यांच्या ‘सायबर राखी’तून डिजिटल सुरक्षेचा संदेश
शब्बीर खान यावल/जळगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला सायबर जनजागृतीची जोड देत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, क्विक हील फाउंडेशन आणि क्यूएचएफ सायबर वॉरियर्स क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या ५० आकर्षक ‘सायबर राखीं’च्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः ५० आकर्षक राख्या तयार केल्या. पारंपरिक राखीला आधुनिक स्वरूप देत प्रत्येक राखीवर विविध सायबर फसवणुकींपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा सूचना लिहिण्यात आल्या. तसेच फसवणूकविरोधी मोबाईल अनुप्रयोगाची क्यूआर संकेतचित्रे राखींवर देण्यात आली. त्याद्वारे नागरिकांना सायबर सुरक्षेशी संबंधित उपयुक्त माहितीपर्यंत सहज पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या राख्या वाहतूक पोलिस तसेच सराफ व्यावसायिकांना बांधल्या. राखी बांधण्यासोबतच विद्यार्थ्यांनी एकदाच वापरला जाणारा संकेतांक (ओटीपी), यूपीआय गुप्त क्रमांक, संशयास्पद संकेतस्थळांच्या जोडण्या, बनावट दूरध्वनी आणि ऑनलाइन फसवणूक याबाबत थोडक्यात जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांनी रक्षाबंधनाच्या भावनेला सामाजिक संदेशाची जोड दिली. ‘सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे संरक्षण करणे हीदेखील आजच्या काळातील जबाबदारी आहे,’ हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.
पारंपरिक सणाचा उपयोग समाजोपयोगी जनजागृतीसाठी करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचा भाग ठरला. सर्जनशीलतेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून करण्यात आले.
: सायबर सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांचा संदेश.
ओटीपी, यूपीआय गुप्त क्रमांक कुणालाही सांगू नका!
संशयास्पद संकेतस्थळांच्या जोडण्यांवर क्लिक करू नका.
बनावट दूरध्वनी व संदेशांपासून सावध राहा.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा.

No comments