केळी उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट तात्काळ द्या; — मनसे शेतकरी सेनेची मागणी यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : जळगाव जिल्...
केळी उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट तात्काळ द्या; — मनसे शेतकरी सेनेची मागणी
यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवावी, तसेच शेतकऱ्यांनी विकलेल्या केळीचा संपूर्ण मोबदला तात्काळ रोखीने अथवा बँक खात्यावर जमा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अमोल बन्सीलाल पाटील, जिल्हा सचिव (रावेर लोकसभा), महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी तालुका कृषी अधिकारी, यावल यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना लागवड, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि संगोपनासाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेक शेतकरी हा खर्च भागवण्यासाठी कर्ज किंवा हातउसने पैसे घेतात. मात्र, केळीचा माल व्यापाऱ्यांना विकल्यानंतरही अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत आहे.
माल घेतल्यानंतर पेमेंट थकीत ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच खरेदी केलेल्या मालाची पावती, वजन, दर आणि पेमेंटची स्पष्ट नोंद शेतकऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. केळी खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय देखरेख यंत्रणा निर्माण करावी, शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंटसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू करावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य व पारदर्शक बाजारभाव मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
“शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या केळीचा पैसा मिळवण्यासाठी त्याला व्यापाऱ्यांच्या मागे फिरावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांच्या मालाचा मोबदला वेळेवर मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने केली आहे.

No comments