adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतमजूर विधवा आईच्या कष्टांना मिळाले यशाचे सोनेरी फळ; कांचन महाजन एमपीएससीतून STI पदी निवड

  शेतमजूर विधवा आईच्या कष्टांना मिळाले यशाचे सोनेरी फळ; कांचन महाजन एमपीएससीतून STI पदी निवड  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमका...

 शेतमजूर विधवा आईच्या कष्टांना मिळाले यशाचे सोनेरी फळ; कांचन महाजन एमपीएससीतून STI पदी निवड 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

परिस्थिती कितीही हलाखीची किंवा कठीण असो, मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो, याचा प्रेरणादायी प्रत्यय रावेर शहरातील कांचन जयंत महाजन यांच्या यशातून आला आहे. शेतमजूर विधवा आईने काबाडकष्ट करून मुलांना शिकवले आणि त्याच आईच्या कष्टांना अखेर मुलीच्या यशाने सोनेरी किनार मिळाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, कांचन जयंत महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातून २३ व्या क्रमांकाने दैदिप्यमान यश मिळवत STI पदावर निवड झाली आहे. कांचनच्या या यशाची बातमी समजताच कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.

कांचन महाजन यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांचे १९ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी हेमलता महाजन यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतात शेतमजुरी केली. उन्हाची, पावसाची आणि कष्टाची पर्वा न करता त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.

आईच्या या संघर्षाला कांचनने आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची जोड दिली. अनेक अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर एमपीएससीच्या अंतिम निकालात २३ वा क्रमांक मिळवत तिने आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले.

“आईने केलेल्या कष्टांमुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहोचले,” अशी भावना कांचन महाजन यांनी व्यक्त केली. आपल्या यशानंतर त्यांनी युवक-युवतींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपण करत असलेल्या मेहनतीवरही विश्वास ठेवा. नैराश्यात जगू नका. आजच्या हायटेक युगात युवक-युवतींसमोर यशाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्या संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न करण्याची.”

कांचन महाजन यांच्या या यशामुळे विधवा आईच्या संघर्षाला, मुलीच्या जिद्दीला आणि मेहनतीला मिळालेला हा विजय म्हणून रावेर शहरात त्यांच्या कुटुंबाचे कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले कांचनचे यश अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

No comments