adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘लोकसंवाद-2026’ अंतर्गत सायबर सुरक्षेचा जागर समाज माध्यमांचा वापर करताना सजग राहण्याचे पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांचे आवाहन

‘लोकसंवाद-2026’ अंतर्गत सायबर सुरक्षेचा जागर समाज माध्यमांचा वापर करताना सजग राहण्याचे पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांचे आवाहन अहिल्यानगर /...

‘लोकसंवाद-2026’ अंतर्गत सायबर सुरक्षेचा जागर

समाज माध्यमांचा वापर करताना सजग राहण्याचे पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांचे आवाहन






अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा

(संपादक : हेमकांत गायकवाड)


‘गणेशोत्सव’ हा महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील लोकसहभागाचा मोठा उत्सव आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. 

या लोकसहभागाचा प्रभावी उपयोग करून शासनाचे विविध धोरणात्मक निर्णय, लोककल्याणकारी योजना आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगांव येथील स्वामी सामाजिक प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे सायबर सुरक्षा विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी उपस्थित नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, बनावट सोशल मीडिया अकाऊंट, ओटीपीची मागणी, ऑनलाइन आर्थिक व्यवहारातील फसवणूक तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या सायबर गुन्ह्यांचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे श्री. टिपरसे यांनी सांगितले.

समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट, संदेश किंवा लिंकवर तातडीने विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती, बँक खात्याचे तपशील अथवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. आकर्षक ऑफर, बक्षीस, नोकरी किंवा आर्थिक मदतीच्या नावाखाली आलेल्या संदेशांची खातरजमा केल्याशिवाय त्यावर कोणतीही कृती करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड मजबूत ठेवणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे, अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड न करणे आणि मोबाईलमध्ये येणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे यासारख्या उपाययोजना नागरिकांनी नियमितपणे कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून व्यवहार थांबविण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी सांगण्यात आले.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, जनहिताचे उपक्रम तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न ‘लोकसंवाद-2026’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून डिजिटल माध्यमांचा सुरक्षित, जबाबदार आणि सजग वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी स्वामी सामाजिक प्रतिष्ठान बोल्हेगांव- अध्यक्ष मदन आढाव, सचिव प्रमोद कोरडे, उमेश आढाव,बद्रीनाथ देशमुख, प्रकाश सप्रे, निलेश मंचरकर तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

No comments