नवसाक्षर पालकांना ऑनलाइन व्यवहाराचे धडे; साक्षरतेतून आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन जळगाव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) मानव सेवा मं...
नवसाक्षर पालकांना ऑनलाइन व्यवहाराचे धडे; साक्षरतेतून आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवसाक्षर पालकांना साक्षरतेचे महत्त्व सांगून दैनंदिन जीवनातील व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. माया अंबटकर यांनी नवसाक्षर पालकांना मार्गदर्शन केले. साक्षरता ही केवळ अक्षरओळख नसून व्यक्तीला आत्मविश्वासाने जीवन जगण्याची ताकद देणारे माध्यम आहे. नियमित वाचन-लेखनाचा सराव करून ज्ञानाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा शिक्षक सुनिल दाभाडे यांनी नवसाक्षरांना मार्गदर्शन करताना अक्षरओळखीचे महत्त्व, मूलभूत वाचन-लेखन तसेच ऑनलाइन पेमेंट कसे करावे, याबाबत सोप्या पद्धतीने माहिती दिली. दररोज वाचन व लेखनाचा सराव केल्यास अक्षरज्ञानासोबत आत्मविश्वासही वाढतो, असे त्यांनी सांगितले. मोबाईल व डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि योग्य वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी साक्षरता शपथ घेण्यात आली.
यावेळी शाळेतील नवसाक्षर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील तसेच माध्यमिक विभागाच्या सौ. अलका महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्गाने कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कौतुक केले.



No comments