adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तृतीयपंथी बांधवांच्या हातात रोजगाराची ‘रिक्षा’; मराठी प्रतिष्ठानचा पुढाकार ४५% अनुदानाच्या योजनेचा लाभ मिळवून देणार; रिक्षा सुरू झाल्यानंतरही प्रतिष्ठान देणार सहकार्य

तृतीयपंथी बांधवांच्या हातात रोजगाराची ‘रिक्षा’; मराठी प्रतिष्ठानचा पुढाकार ४५% अनुदानाच्या योजनेचा लाभ मिळवून देणार; रिक्षा सुरू झाल्यानंतरह...

तृतीयपंथी बांधवांच्या हातात रोजगाराची ‘रिक्षा’; मराठी प्रतिष्ठानचा पुढाकार

४५% अनुदानाच्या योजनेचा लाभ मिळवून देणार; रिक्षा सुरू झाल्यानंतरही प्रतिष्ठान देणार सहकार्य



जळगाव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

तृतीयपंथी बांधवांना केवळ सहानुभूती न देता त्यांच्या हाताला रोजगार आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मराठी प्रतिष्ठान, जळगाव यांनी पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथी समाजातील इच्छुक व पात्र व्यक्तींना शासकीय योजना, सवलत व अनुदानाच्या माध्यमातून प्रवासी अथवा मालवाहतूक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मराठी प्रतिष्ठान प्रयत्न करणार आहे.

या संदर्भात मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी समाज कल्याण विभागाच्या मा. सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांची भेट घेऊन निवेदन साद केले.

यावेळी तृतीयपंथी बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये तृतीयपंथी लाभार्थ्यांसाठी ४५ टक्के अनुदानाची योजना उपलब्ध असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली.

या अनुदान योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित विभागांशी समन्वय करण्यासाठी मराठी प्रतिष्ठान पुढाकार घेणार आहे.

ई-रिक्षा व्यवसायातून तातडीने रोजगार

तृतीयपंथी बांधवांसाठी ई-रिक्षा हा असा व्यवसाय आहे की, वाहन उपलब्ध झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन तुलनेने कमी कालावधीत व्यवसाय सुरू करता येतो आणि दररोज उत्पन्नाचे साधन निर्माण करता येते. त्यामुळे दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.

विशेष म्हणजे तृतीयपंथी लाभार्थी ई-रिक्षा व्यवसाय सुरू केल्यानंतरही मराठी प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, ई-रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेसाठी मदत तसेच व्यवसायाशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार मराठी प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देताना तृतीयपंथी बांधवांच्या ई-रिक्षांना विशिष्ट व आकर्षक रंग देण्याची मागणी परिवहन विभागाकडे करण्याचा निर्णय मराठी प्रतिष्ठानने घेतला आहे.

तृतीयपंथी बांधव रिक्षा चालवत आहेत हे दूरूनच लक्षात यावे, त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि प्रवाशांनाही त्यांची रिक्षा सहज ओळखता यावी, या उद्देशाने रिक्षांसाठी विशिष्ट रंग किंवा रंगसंगती निश्चित करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

ही ओळख केवळ वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नसून, “तृतीयपंथी बांधवही सन्मानाने व्यवसाय करीत आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वावलंबीपणे योगदान देत आहेत,” हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी असेल.

मराठी प्रतिष्ठानने यापूर्वी जळगाव शहरात महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम केले आहे. संस्थेच्या माध्यमातून २२ महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, १० महिलांना मालवाहू ई-रिक्षा उपलब्ध करून देत स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्यात आली आहे. याच अनुभवाच्या आधारावर आता तृतीयपंथी बांधवांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 ई-रिक्षा व्यवसाय हा लवकर सुरू करता येणारा आणि रोजच्या उत्पन्नाचा मार्ग निर्माण करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शासकीय अनुदानाच्या माध्यमातून ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असून, रिक्षा व्यवसाय सुरू झाल्यानंतरही मराठी प्रतिष्ठान संबंधित लाभार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील,” असे मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले.

तसेच, “तृतीयपंथी बांधवांची रिक्षा दूरूनच ओळखता यावी, यासाठी विशिष्ट रंगाची रिक्षा देण्याची मागणी परिवहन विभागाकडे करण्यात येणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथी समाजासाठी एक सकारात्मक आणि अभिमानास्पद ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी समाज कल्याण विभाग, परिवहन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थी निवड, अनुदान, कर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मराठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार आहे.

अधिक माहितीसाठी मराठी प्रतिष्ठान, गणपती नगर, कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments