adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनदाई वीज मंडळ पतसंस्थेची सभासदहिताची नवी दिशा अपघाती विमा संरक्षण ५ लाखांवर; कर्जमर्यादेत वाढ १ ऑक्टोबरपासून व्यवहार ऑनलाइन

धनदाई वीज मंडळ पतसंस्थेची सभासदहिताची नवी दिशा अपघाती विमा संरक्षण ५ लाखांवर; कर्जमर्यादेत वाढ १ ऑक्टोबरपासून व्यवहार ऑनलाइन धरणगाव प्रतिनिध...

धनदाई वीज मंडळ पतसंस्थेची सभासदहिताची नवी दिशा

अपघाती विमा संरक्षण ५ लाखांवर; कर्जमर्यादेत वाढ

१ ऑक्टोबरपासून व्यवहार ऑनलाइन




धरणगाव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 धनदाई वीज मंडळ सहकारी पतसंस्था मर्यादित, धरणगावची सर्वसाधारण जनरल सभा चेअरमन भूषण मराठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून पतसंस्थेच्या कारभारात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील जुन्या व जाणकार सभासदांनी उभारलेल्या या पतसंस्थेने आजवरच्या वाटचालीत अनेक आव्हानांवर मात केली असून, आता संस्थेची वाटचाल भक्कम आर्थिक पायाभरणीकडे सुरू आहे. अल्प सभासदसंख्या असतानाही अनावश्यक खर्चाला आळा घालत काटकसरीचे धोरण, अभ्यासपूर्ण नियोजन आणि पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून संस्थेचा कारभार पुढे नेण्यात संचालक मंडळाला यश आले आहे.

सभासदांच्या सुरक्षिततेचा विचार करून अपघाती विमा संरक्षण ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विम्यासाठी सभासदांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आलेला नाही. तांत्रिक व जोखमीच्या स्वरूपाचे काम करणाऱ्या सभासदांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

याशिवाय मोठ्या कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून ६ लाख रुपये, तर अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी तातडीच्या कर्जाची मर्यादा ३० हजारांवरून ४० हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सभासदांना आर्थिक अडचणीच्या काळात अधिक आधार मिळणार आहे.

पतसंस्थेच्या कामकाजात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. १ ऑक्टोबर २०२६ पासून पतसंस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे सभासदांना व्यवहार अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार आहेत.

दरम्यान, सभासदांनी दिलेल्या विश्वास व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व सभासदांना VIP ब्रँड कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगचे वाटप करण्यात येत आहे. सभासदसंख्या वाढविण्यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न करण्याचा निर्धारही संचालक मंडळाने व्यक्त केला. तसेच सभासदांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कर्जावरील व्याजदर १० टक्क्यांवरून ९ टक्के करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

पतसंस्थेचा कारभार केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न ठेवता सभासदांच्या गरजा, सुरक्षितता आणि आर्थिक प्रगतीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला पारदर्शक आणि सभासदहिताच्या निर्णयांतून न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

सभेच्या यशस्वी आयोजनासाठी मानद सचिव किशोर जगताप, चेअरमन भूषण मराठे,सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

No comments