सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या कार्याची दखल; कल्पेश पवार यांना ‘युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार’ नायगाव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवा...
सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या कार्याची दखल; कल्पेश पवार यांना ‘युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार’
नायगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नायगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष व शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. कल्पेश राजेंद्र पवार यांना दैनिक नवराष्ट्रच्या वतीने ‘युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार व माजी मंत्री श्री. अनिलदादा पाटील, जळगाव जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत ढिवरे तसेच दैनिक नवराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या विद्यार्थी, सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत दैनिक नवराष्ट्रने हा सन्मान दिल्याबद्दल श्री. कल्पेश पवार यांनी नवराष्ट्र परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आजवर केलेल्या कार्याची पोचपावती आणि भविष्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी क्षण आहे. समाजातील विद्यार्थी, युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा या सन्मानातून मिळाली आहे,” अशी भावना श्री. पवार यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार त्यांनी आपल्या आई-वडिलांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मार्गदर्शक अमितसाहेब ठाकरे, त्यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नी सौ. वैशाली पवार तसेच आपल्या सर्व युवा सहकाऱ्यांना समर्पित केला.
“माझ्यावर विश्वास ठेवून सदैव प्रेरणा व साथ देणाऱ्या सर्वांचे हे यश आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यात समाजासाठी अधिक प्रामाणिकपणे आणि ताकदीने काम करण्याचा माझा संकल्प आहे,” असेही कल्पेश पवार यांनी सांगितले.
सामान्य कुटुंबातील तरुणाने सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्यातून निर्माण केलेल्या योगदानाची दखल घेत मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



No comments