स्वप्निल सोनवणे यांना पीएच.डी. जाहीर हातेड खु / लासुर ता. चोपडा येथील सोनवणे कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय...
स्वप्निल सोनवणे यांना पीएच.डी. जाहीर
हातेड खु / लासुर ता. चोपडा येथील सोनवणे कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत लासूर, ता. चोपडा येथील रहिवासी तथा ह.मु. हातेड खुर्द, ता. चोपडा येथील स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या कुटुंबासह नाभिक समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर घातली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी. जाहीर केली आहे.
स्वप्निल सोनवणे हे कै. किसन खंडू सोनवणे यांचे नातू व श्री. छोगालाल किसन सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. श्री. छोगालाल सोनवणे हे नाभिक संघ, भुसावळ शहराचे माजी अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे.
स्वप्निल सोनवणे यांनी डॉ. सुदेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली “Citation Analysis of Journal of Indian Law Institute” या विषयावर संशोधन करून आपला शोधप्रबंध विद्यापीठाकडे सादर केला. त्यांच्या संशोधनाला विद्यापीठाने मान्यता दिल्याने त्यांना पीएच.डी. जाहीर करण्यात आली आहे.
ग्रंथालय व माहितीशास्त्र या अभ्यासपूर्ण विषयात संशोधन करत त्यांनी आपल्या ज्ञानाची, अभ्यासू वृत्तीची आणि सातत्यपूर्ण मेहनतीची प्रचिती दिली आहे. त्यांच्या या यशामुळे सोनवणे कुटुंबीय, लासूर, हातेड खुर्द परिसर तसेच नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वप्निल सोनवणे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
शब्दांकन : शामसुंदर सोनवणे (पत्रकार)
व्यवस्थापकीय संपादक, नेशन महाराष्ट्र

No comments