adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आव्हाणे येथील विठ्ठल मंदिराचे निष्ठावंत सेवेकरी मंगल आबा पाटील काळाच्या पडद्याआड धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा; विठ्ठल मंदिराच्या सेवेला वाहिले आयुष्य

 आव्हाणे येथील विठ्ठल मंदिराचे निष्ठावंत सेवेकरी मंगल आबा पाटील काळाच्या पडद्याआड धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा; विठ्ठल मंदिराच्या सेवे...

 आव्हाणे येथील विठ्ठल मंदिराचे निष्ठावंत सेवेकरी मंगल आबा पाटील काळाच्या पडद्याआड

धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा; विठ्ठल मंदिराच्या सेवेला वाहिले आयुष्य 


आव्हाणे प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आव्हाणे येथील विठ्ठल मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष तथा विठ्ठल मंदिराचे निष्ठावंत सेवेकरी ह.भ.प. मंगल नारायण पाटील (मंगल आबा) यांचे गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने आव्हाणे गावातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मंगल आबा पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्ती, मंदिरसेवा, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाला वाहून घेतले. विठ्ठलाच्या सान्निध्यात राहून त्यांनी संसाराची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आपल्या मुलांना उत्तम संस्कार दिले.

गेली अनेक वर्षे त्यांनी विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्षपद भूषविले. प्रकृतीच्या कारणास्तव मागील वर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र पदाचा त्याग केल्यानंतरही मंदिरसेवेचा त्यांचा ध्यास अखेरपर्यंत कायम राहिला. मंदिराचा अध्यक्ष कोणीही असो, मंदिराची स्वच्छता व देखभाल, धार्मिक उपक्रमांचे आयोजन तसेच मंदिरात येणाऱ्या संत-महंतांची सेवा करण्यात मंगल आबा सदैव अग्रभागी असत.

गावातील कोणताही धार्मिक कार्यक्रम मंगल आबांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसे. साधी राहणी, आध्यात्मिक विचार, प्रेमळ स्वभाव आणि निस्वार्थ सेवाभाव यामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. विठ्ठल मंदिराच्या परंपरा जपण्यात आणि धार्मिक वातावरण टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले.

त्यांच्या निधनाने विठ्ठल मंदिराने एक निष्ठावंत सेवेकरी, गावाने एक आध्यात्मिक मार्गदर्शक तर कुटुंबाने प्रेमळ आधार गमावला आहे. मंगल आबा आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी केलेली मंदिरसेवा, जपलेल्या धार्मिक परंपरा आणि दिलेले संस्कार ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहतील.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

विठ्ठलभक्त, सेवाभावी आणि आध्यात्मिक विचारांचे मंगल आबा पाटील यांच्या निधनाने आव्हाणे गावावर दुःखाची छाया पसरली असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

— भगवान चौधरी
माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते

No comments