विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळ्याने सर्वोदय विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात चहार्डी येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव ...
विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळ्याने सर्वोदय विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात
चहार्डी येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चहार्डी, ता. चोपडा : येथील सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन नानासो. श्री. दगडू भगवान पाटील होते. तसेच चहार्डी विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी संस्थेचे कार्यकारिणीचे चेअरमन दादासो. डॉ. श्री. अनिल रामदास पाटील, संस्थेचे सचिव ॲड. श्री. प्रकाश आनंदराव पाटील, शालेय समिती सदस्य श्री. नारायण ताथू पाटील, मा. श्री. नारायण आधार पाटील तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. भूषण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल पाटील सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ITSE, GTS व शिष्यवृत्ती परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सन २०२५-२६ मध्ये झालेल्या विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या वंशिका शक्ती अहीरे हिचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी मनोगते व भाषणे सादर केली. भाषणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी गुरुंच्या जीवनावर आधारित गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शालेय समितीचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

No comments