adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धुपे खुर्द परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्या ठार

  धुपे खुर्द परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्या ठार घाडवेल येथे वासराची शिकार; घोडगावातही दोन शेळ्या ठार — परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा ...

 धुपे खुर्द परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्या ठार

घाडवेल येथे वासराची शिकार; घोडगावातही दोन शेळ्या ठार — परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता




विचखेडा, ता. चोपडा (वार्ताहर) :

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 विचखेडा परिसरासह धुपे खुर्द, घाडवेल व घोडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुपे खुर्द येथे दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री बिबट्याने शरद बाबूलाल पवार यांच्या तीन शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पाच ते सहा दिवसांपूर्वी घाडवेल येथील एकनाथ श्रावण पाटील यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यानंतर दि. ११ सप्टेंबर रोजी दिवसा घाडवेल ते विचखेडा दरम्यानच्या नाल्यात बळीराम लक्ष्मण पाटील यांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. दि 11 सप्टेंबर रोजी रात्री घोडगाव परिसरातही बिबट्याने दोन शेळ्या ठार केल्याची घटना समोर आली आहे.

एकाच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा वावर आणि हल्ल्याच्या घटना घडत असल्याने या भागात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी व पंचनामा

धुपे खुर्द येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कुवर, चोपडा प्रादेशिक वनपरिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी विजय शिरसाठ, शुभम पाटील, राहुल पाटील व गोविंदा चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

यावेळी श्री. विजय शिरसाठ यांनी हल्ला झालेल्या परिसराची सविस्तर पाहणी करून पंचनामा केला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून, लवकरच नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये तसेच शेत परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

वन्यप्राणी बिबट्याबाबत घ्यावयाची सतर्कता :


1. रात्री एकट्याने बाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास समूहाने व पुरेशा प्रकाशात जावे.                                      2. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना रात्री एकट्याने बाहेर पाठवू नये.                                                                           3. रात्री शेतात किंवा घराबाहेर जाताना टॉर्चचा वापर करावा.  4. शेतात जाताना झुडपे, केळी, ऊस व दाट गवतामध्ये विशेष सावधगिरी बाळगावी.

5. पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी अथवा गोठ्यात बंदिस्त ठेवावे.

6. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, पाठलाग करू नये किंवा त्याला घेरू नये.

7. बिबट्या दिसल्यास गर्दी न करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.

8. बिबट्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.

9. बिबट्या समोर आल्यास घाबरून धावत सुटू नये; शांत राहून हळूहळू सुरक्षित अंतरावर जावे.

10. अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती पसरवू नये.

“बिबट्या हा सामान्यतः माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला त्रास न देता सुरक्षित अंतर राखणे आणि वनविभागाला तात्काळ माहिती देणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे,” असे मार्गदर्शन बी. डी. कुवर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा प्रादेशिक यांनी केले.

No comments