सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंप्री कन्या विद्यालयात व्यसनमुक्ती व कॅन्सर प्रतिबंधावर मार्गदर्शन वैद्यकीय आघाडी व पाळधी मंडळाच्या संयुक्त विद्...
सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंप्री कन्या विद्यालयात व्यसनमुक्ती व कॅन्सर प्रतिबंधावर मार्गदर्शन
वैद्यकीय आघाडी व पाळधी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगाव : पिंप्री येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगाव पश्चिम जिल्हा वैद्यकीय आघाडी व पाळधी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंप्री कन्या विद्यालयात व्यसनमुक्ती व कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष वैद्यकीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नवीन यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई पंढरीनाथ पाटील होत्या.
चांडक कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी विद्यार्थिनींना व्यसनांचे दुष्परिणाम, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच कॅन्सरचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता आवश्यक उपचार व काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाळधी मंडळाध्यक्ष श्री. किशोर ब्रिजलाल झंवर यांनी केले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सेवा संकल्प अभियानांतर्गत महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष वैद्यकीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री. किशोर ब्रिजलाल झंवर, माजी जि.प. सदस्या सौ. वैशालीताई पंढरीनाथ पाटील, श्री. सदाशिव पाटील (चिंचपुरा), युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीपदादा पाटील, माजी सरपंच श्री. विजूदादा पाटील (भोद), श्री. भगतसिंग आप्पा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ. वैशालीताई पाटील यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक श्री. एम. एन. पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील बडगुजर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संदीपदादा पाटील यांनी मानले.

No comments