adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरोग्य तपासणीला प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून प्राधान्य द्यावे - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

  आरोग्य तपासणीला प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून प्राधान्य द्यावे - कुलगुरू डॉ. विलास खर्चे  जावेद शेख/ राहुरी :  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 आरोग्य तपासणीला प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून प्राधान्य द्यावे - कुलगुरू डॉ. विलास खर्चे 


जावेद शेख/ राहुरी : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दैनंदिन कामकाजाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. आजाराची लक्षणे दिसेपर्यंत उपचार न घेण्याची मानसिकता बदलून नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर 2026 हा आगळावेगळा आणि अभिमानास्पद उपक्रम आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि जी.के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिर 2026 या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, अप्पर जिल्हाधिकारी तथा कृषि परिषदेच्या सहसंचालक प्रशासन श्रीमती आरती भोसले, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, कृषि परिषदेचे संचालक शिक्षण डॉ. किशोर शिंदे, संचालक विस्तार डॉ. प्रकाश सानप, संचालक संशोधन डॉ. विकास लोंढे, विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंडचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड, जी.के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुंडाप्पा खडके, श्रीलक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्टचे उपाध्यक्ष अनंता प्रभाळे, पाटील इव्हेंट मॅनेजमेंटचे चंद्रकांत डोमा व आपुलकी हॉस्पिटलचे संचालक प्रतीक कर्णवत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की देशात सुमारे 75 कृषि विद्यापीठे कार्यरत असली तरी महाराष्ट्रात कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याला दिशा व आधार देणारी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ही देशातील एकमेव अशा स्वरूपाची कृषि परिषद आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यामध्ये परिषदेची भूमिका महत्वपूर्ण आहे. अशा संस्थेच्या माध्यमातून आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन होणे ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमती आरती भोसले यांनी आपण याच कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच सकारात्मक दृष्टिकोनातून सेवाभावी उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कृषि महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विशेषताः मजूर वर्गाच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन जी.के. फाउंडेशनच्या सहकार्याने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मधुमेह, कर्करोग यासारख्या आजारांचे वेळेवर निदान करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यावश्यक असून उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ या भूमिकेतून अशा उपक्रमाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

 निरोगी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हा सक्षम प्रशासनासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज हाच सक्षमीकरणाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. 

यावेळी डॉ. रुचिता भोईर यांनी स्तनांचा कर्करोग तर दात्री फाउंडेशनच्या डॉ. सोनाली धस यांनी स्टेम सेल्सचे महत्व या विषयावर माहिती दिली. दि. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 2026 या कालावधीत जनरल फिजिशियन, हृदयरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, स्रीरोग तज्ञ, कर्करोग तज्ञ, तसेच दंतचिकित्सक यांच्यामार्फत मोफत वैद्यकीय तपासणी व तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे श्रीमती भोसले यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुभाष भालेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद व कृषि महाविद्यालय, पुणे येथील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------------------------

 वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

No comments