ग्रामगीतेचा झंझावाती प्रचारक अन् आदर्श ग्रामनिर्मितीचा ध्यास घेतलेला कर्मयोगी ! आद्यग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६ व...
ग्रामगीतेचा झंझावाती प्रचारक अन् आदर्श ग्रामनिर्मितीचा ध्यास घेतलेला कर्मयोगी !
आद्यग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त लेख विशेष....
"अरे रिकामा कशाला फिरतो !
तुझं गावच नाही का तीर्थ !!"
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या या भजनातील ग्रामविकासाचा संदेश आपल्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू मानून, ग्रामगीतेचा प्रचार-प्रसार करत संपूर्ण भारतभर भ्रमंती करणारे आद्यग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर हे केवळ ग्रामगीतेचे प्रचारक नव्हते, तर प्रत्यक्ष कृतीतून आदर्श ग्रामनिर्मितीचा ध्यास घेणारे कर्मयोगी होते. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिनी त्यांच्या तिथीप्रमाणे ९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे ग्रामविकासाच्या एका प्रेरणादायी पर्वाला उजाळा देणे होय.
राष्ट्रसंतांच्या विचारांची बालपणापासूनच प्रेरणा
इ.स. १९३० मध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे मामे आजोळ आणि सद्गुरू परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या वरखेड येथे रामकृष्णदादांचा जन्म झाला. आई देवकीबाई आणि वडील मोतीरामजी बेलूरकर हे सद्गुरूंच्या सेवा कार्याशी जोडलेले होते. मंजुळामाता यांच्या कुटुंबाशीही त्यांचे जवळचे नाते होते. अशा संस्कारक्षम वातावरणात दादांचे बालपण स्वातंत्र्यपूर्व काळात घडले.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सहवासातून मिळालेली प्रेरणा आणि ग्रामविकासाचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आधार बनला. दादांनी लिहिलेली ‘राष्ट्रसंताचे गुरुदेव’, ‘युगप्रवर्तक राष्ट्रसंत’, ‘पूज्य मंजुळामाता चरित्र’ आणि ‘चार महर्षी’ यांसारखी पुस्तके वाचली की त्यांच्या विचारविश्वाची आणि अभ्यासाची व्यापकता जाणवते.
औषधोपचारापासून व्यायामशाळेपर्यंत सेवा कार्य
राष्ट्रसंतांच्या प्रचार दौऱ्यांमध्ये दादांना त्यांचा सहवास लाभला. गुरुकुंज आश्रमाची उभारणी होण्यापूर्वी राष्ट्रसंतांचा बराच काळ वरखेड परिसरात गेला. त्याच काळात आयुर्वेदतज्ज्ञ कुर्डुकर शास्त्री आणि वैद्य महेन्द्रकर यांच्या सहवासातून दादांनी औषधनिर्मिती व औषधोपचाराचे ज्ञान आत्मसात केले. पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी गावातील गरजू आणि आजारी लोकांची सेवा केली.
गावात धर्मार्थ दवाखाना चालविण्यासोबतच राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने व्यायामशाळाही सुरू केली. शेकडो युवकांनी लाठी-काठी, मल्लखांब, कुस्ती व विविध कसरतींचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे वरखेडच्या आखाड्याचा नावलौकिक पंचक्रोशीत झाला.
आदर्श ग्रामनिर्मितीसाठी विविध विधायक उपक्रम
दादांचे कार्य केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रबोधनापुरते मर्यादित राहिले नाही. दुष्काळाच्या काळात अन्नधान्य कोठार, धान्य संकलन, तेलघाणी, घरकुल योजना, सामुदायिक बँड पथक आणि सामुदायिक शेती अशा विविध रचनात्मक उपक्रमांची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली.
गाव स्वावलंबी व्हावे, युवक सक्षम व्हावेत, महिलांना सुविधा मिळाव्यात आणि ग्रामस्थांमध्ये सामाजिक एकोपा वाढावा, या व्यापक विचारातून त्यांनी काम केले.
‘शरीराची कुस्ती सोड, आता दिमागाची कुस्ती लढ!’
इ.स. १९५३ मध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना ग्रामगीता लेखनाची प्रेरणा मिळाली. पुढे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर १९५५ रोजी एकाच वेळी एक हजार ठिकाणी ग्रामगीता प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
यानंतर राष्ट्रसंतांनी रामकृष्णदादांना सांगितले—
“रामकृष्णा, अब शरीर की कुस्ती छोड़ दे, अब दिमाग की कुस्ती लड़ते जा!”
आणि जणू त्याच क्षणापासून दादांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. ग्रामगीतेचा संदेश घेऊन ते गावोगावी, खेडोपाडी, वस्त्या-वस्त्यांवर आणि शहरांमध्ये पोहोचू लागले. त्यांच्या प्रभावी कीर्तन, प्रवचन आणि प्रबोधनातून ग्रामगीतेचा विचार जनमानसात रुजत गेला.
राष्ट्रसंतांच्या निर्वाणानंतरही जबाबदारी समर्थपणे पेलली
इ.स. १९६८ मध्ये राष्ट्रसंतांच्या निर्वाणानंतर सद्गुरू परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज संस्थान, वरखेडच्या कार्याची मोठी जबाबदारी रामकृष्णदादांच्या खांद्यावर आली. आर्थिक अडचणी, शेतीचे प्रश्न आणि मर्यादित उत्पन्न अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संस्थेच्या परंपरा आणि उत्सव अखंडित ठेवले.
ग्रामगीता प्रबोधनासाठी ज्या गावांमध्ये ते जात, तेथील भक्त, दर्शनार्थी व सहयोगदात्यांना जोडून त्यांनी परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांचा १६१ वा जयंती महोत्सव आणि पूज्य मंजुळामाता जन्मशताब्दी महोत्सव भव्य स्वरूपात साकारला. या माध्यमातून उभारलेल्या निधीतून ‘परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज व मंजुळामाता शाश्वत अन्नदान योजना’ सुरू करण्यात आली. निधी कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवून त्याच्या व्याजातून अन्नदानाची परंपरा अखंड सुरू राहावी, अशी दूरदृष्टी त्यांनी दाखवली.
गावाच्या विकासासाठी उभारले सांस्कृतिक भवन
वरखेडच्या विकासातही दादांचा मोठा वाटा राहिला. गावातील माजी शिक्षक आणि पुढे खासदार झालेले श्री विजय मुडे यांच्या सहकार्याने तसेच तत्कालीन सरपंच श्री दिलीप भुयार यांच्या कार्यकाळात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात आले. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती करून गावातील मूलभूत सुविधांनाही त्यांनी चालना दिली.
कासार समाजासाठीही भरीव योगदान
समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्यही दादांनी केले. समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कासार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विदर्भ कासार संमेलन आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी वरखेड येथे होणारे हे संमेलन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक एकतेचे व्यासपीठ ठरले आहे.
व्यायाम मंदिर, वाचनालय अन् साहित्यसेवेची त्रिवेणी
इ.स. १९४५ पासून वरखेडच्या युवक-युवतींसाठी सुरू असलेले व्यायाम मंदिर, तसेच बौद्धिक विकासासाठी उभारलेले वाचनालय, ही दादांच्या दूरदृष्टीची उदाहरणे आहेत.
इतकेच नव्हे, तर वरखेडसारख्या ग्रामीण भागातून ‘श्री माणिक प्रकाशन, श्रीक्षेत्र वरखेड’ ही संस्था उभारून त्यांनी साहित्यसेवेलाही नवी दिशा दिली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या बालपणीच्या वरखेडचे नाव साहित्यविश्वात जिवंत ठेवण्याचे कार्य त्यांनी केले.
रामकृष्णदादांच्या लेखणीतून आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी श्री माणिक प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
तिसऱ्या-चौथ्या पिढीपर्यंत पोहोचले सेवा कार्य
सुमारे चार-पाच दशके संस्थेच्या सचिव व सदस्यपदाची जबाबदारी सांभाळताना ग्रामगीता प्रचार-प्रसाराचे कार्य त्यांनी अखंड सुरू ठेवले. इ.स. २००० मध्ये सचिवपदाची जबाबदारी संस्थेतील इतर पदाधिकाऱ्यांकडे सोपविल्यानंतरही त्यांचे ग्रामप्रबोधनाचे कार्य थांबले नाही.
आज त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत तिसरी-चौथी पिढी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सेवा कार्याला वाहून घेत आहे, हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी पावती आहे.
‘ग्रामगीता’ घराघरात पोहोचविणारा अविरत प्रवास
ग्रामगीता हा केवळ ग्रंथ नाही, तर ग्रामजीवनाला दिशा देणारा विचार आहे, या भावनेतून दादांनी आयुष्यभर कार्य केले. गावातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा संदेश पोहोचला पाहिजे, कोणीही मागास राहता कामा नये आणि गाव स्वावलंबी बनले पाहिजे, हा त्यांच्या कार्याचा मूलमंत्र होता.
ग्रामगीता प्रचारक कसा असावा? अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा आदर्श प्रचारक कसा असावा? ग्रामविकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीत कसा उतरवावा? याचे उत्तर शोधायचे असेल, तर आद्यग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा लागेल.
त्यांचे जीवन म्हणजे ग्रामगीतेचा विचार, राष्ट्रसंतांचे संस्कार, सद्गुरूंची सेवा आणि ग्रामनिर्मितीचा ध्यास यांचा सुंदर संगम आहे.
“गीता बोधिली अर्जुनाला!
ग्रामगीता ही सर्व ग्रामाला!
राहू नये कोणी मागासला!
ऐसा बोलिला देव माझा!!”
या ग्रामगीतेतील संदेशाला जीवनध्येय मानून आयुष्यभर ग्रामसेवा, समाजप्रबोधन आणि साहित्यसेवेला वाहून घेतलेल्या आद्यग्रामगीताचार्य पूज्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! ..
लेखक - प्रविण वसंतराव सावरकर
संपादक :सांध्य दैनिक वरूड केसरी
वरूड, जिल्हा. अमरावती
------------------------------------------------
लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174122


No comments