कोळी लोकांनी सामाजिक एकतेसाठी रोटी बेटी व्यवहारासोबत सामुहिक विवाहाचा सकारात्मक विचार करावा.. अकोला अमरावतीच्या मेळाव्यात जगन्नाथ बाविस्कर य...
कोळी लोकांनी सामाजिक एकतेसाठी रोटी बेटी व्यवहारासोबत सामुहिक विवाहाचा सकारात्मक विचार करावा..
अकोला अमरावतीच्या मेळाव्यात जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन...
महाराष्ट्र (प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीमध्ये टोकरे, महादेव, मल्हार आदी विविध शाखा आहेत. या सर्व जमात बांधवांमध्ये रोटी व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असला, तरी बेटी व्यवहाराबाबत अद्याप सामाजिक संकोच व रुढी आढळून येतात. काही ठिकाणी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमाती मधील आंतरशाखीय विवाह झालेले आहेत. मात्र अशा विवाहांना सर्व स्तरांवर समान सामाजिक स्वीकार मिळालेला नाही. त्यामुळे या विषयावर समाजातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी, युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी खुलेपणाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच सामाजिक एकतेच्या उद्देशाने अकोला, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमात बांधवांच्या भेटी घेऊन रोटी बेटी व्यवहारातून सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश देण्यात आला. जमाती मधील विवाह हे संबंधित युवक युवतींची संमती, कुटुंबाची इच्छा, कायदेशीर तरतुदी आणि परस्पर सन्मान यांच्या आधारावरच स्वच्छेने होणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही शाखेतील जमात बांधवांविषयी भेदभाव किंवा सामाजिक दुरावा निर्माण न करता सर्व घटकांना समान सन्मान मिळावा, हा या उपक्रमामागील व्यापक विचार आहे, म्हणून आदिवासी कोळी बांधवांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा म.वाल्मिकी मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.
मोफत सामूहिक विवाह सोहळ्यातून सामाजिक एकतेला चालना मिळाल्याने मागील चार वर्षांपासून जळगाव येथे कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी कोळी लोकांच्या उपवर मुला मुलींसाठी मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. विवाहाचा अनावश्यक खर्च कमी व्हावा, सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा आणि जमाती मधील उपवर युवक युवतींना सन्मानपूर्वक विवाहाची संधी उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याचा संदेश महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमात बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय संपर्क बैठका व जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. अकोला अमरावतीसह इतर जिल्ह्यांमध्ये जमात बांधवांच्या भेटी घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यात येत असून इच्छुक उपवर मुला-मुलींनी या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा. कारण सामूहिक विवाहाच्या माध्यमातून साधेपणा, सामाजिक समता, आर्थिक बचत आणि परस्पर सहकार्य या मूल्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच जमाती मधील विवाहयोग्य युवक युवतींना योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमाचा प्रयत्न आहे, अशी माहिती सामुहिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल कोळी जळगाव यांनी दिली आहे.
रोटी बेटी संवाद व सामूहिक विवाह यांसारखे उपक्रम काळाची गरज झाले आहेत..
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीची एकजुट, सामाजिक समता, परस्पर सन्मान आणि बंधुभाव अधिक मजबूत करण्यासाठी रोटी बेटी संवाद आणि सामूहिक विवाह यांसारखे सामाजिक उपक्रम निश्चितच काळाची गरज झाले आहेत..
जगन्नाथ बाविस्कर, जळगाव.
डॉ. महेंद्र काळे, अकोला.
प्रा. गजानन कासमपुरे, अमरावती.


No comments