पंचायत समिती यावल कार्यालयात प्रिंटरची तोडफोड; पवन भोई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर (संपादक : हेमकांत गाय...
पंचायत समिती यावल कार्यालयात प्रिंटरची तोडफोड; पवन भोई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल, दि. २४ सप्टेंबर २०२६ : पंचायत समिती यावल कार्यालयातील अभिलेख कक्षात कलर प्रिंटरची तोडफोड केल्याप्रकरणी पवन प्रकाश भोई यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील धनराज रघुनाथ चौधरी हे त्यांच्या वडिलांच्या मृत्यू नोंदणीसंदर्भातील कागदपत्रांसाठी २४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती यावल कार्यालयातील अभिलेख कक्षात आले होते. यावेळी कागदपत्रांच्या प्रक्रियेवरून कर्मचारी पवन भोई यांच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या वादादरम्यान चौधरी यांनी अभिलेख कक्षातील कलर प्रिंटर उचलून जमिनीवर आपटल्याने त्याची तोडफोड झाल्याचा आरोप आहे. तसेच कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचेही पंचायत समिती प्रशासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी डॉ. मंजुषी गायकवाड यांनी यावल पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र देऊन संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पवन भोई यांनी स्वतः यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयात कामकाज सुरू असताना कर्मचाऱ्याशी वाद घालून कार्यालयीन साहित्याची तोडफोड केल्याच्या या घटनेमुळे पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.


No comments