बोरगाव बु. येथे २६ वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा कायम गणेशोत्सवातून सामाजिक एकोप्याचे दर्शन; दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन, ग्रामस्थांचा उ...
बोरगाव बु. येथे २६ वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा कायम
गणेशोत्सवातून सामाजिक एकोप्याचे दर्शन; दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील बोरगाव बु. येथे गेल्या २६ वर्षांपासून लोकभावनेतून जपली जात असलेली ‘एक गाव, एक गणपती’ ही अनोखी परंपरा यंदाही भक्तिभावाने कायम ठेवण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.
गावाची लोकसंख्या सुमारे ५ ते ६ हजार असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकता आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली असून, पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले.
या उपक्रमात अध्यक्ष सुदाम निंबा मराठे, उपाध्यक्ष रविंद्र साहेबराव पाटील, सचिव लक्ष्मण भीमराव पाटील तसेच सदस्य सुनिल मिठाराम पाटील, लखिचंद्र वामन पाटील, ज्ञानेश्वर उत्तम मराठे, भाईदास पंतिग पाटील, राजू रायभान पाटील, बापू माधवराव चव्हाण, कैलास गंगाराम पाटील, परशुराम नारायण पाटील, भगवान रावण पाटील, शरद शालिग्राम पाटील, किशोर भास्कर नांदळे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग आहे. गणरायाची पूजा पुजारी यशवंत जिवराम भालेराव यांच्या हस्ते करण्यात आली.
विशेष म्हणजे, गावात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. या धार्मिक व सामाजिक उपक्रमासाठी ग्रामस्थ मोलाचे योगदान देत असतात. हरी विठ्ठल मित्र मंडळासह ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.
‘एक गाव, एक गणपती’च्या माध्यमातून बोरगाव बु. ग्रामस्थांनी एकजूट, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला असून, गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पुढे नेण्यात आली आहे.

No comments