रावेर तालुक्यात महसूल सेवकांच्या ९ रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत पिंप्रीसह आठ सजांसाठी आरक्षण निश्चित; तहसील कार्यालयात पार पडला सोडतीचा कार्यक...
रावेर तालुक्यात महसूल सेवकांच्या ९ रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत
पिंप्रीसह आठ सजांसाठी आरक्षण निश्चित; तहसील कार्यालयात पार पडला सोडतीचा कार्यक्रम
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर तहसील कार्यालयांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, ९ रिक्त पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रावेर तहसील कार्यालयात पार पडला.
फैजपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी रावेरचे तहसीलदार श्री. संजय तायडे, प्रकल्प अधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून श्री. राहुल तायडे, सामाजिक न्याय विभागाच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती कोमल तायडे, नायब तहसीलदार श्री. आर. डी. पाटील तसेच सहाय्यक महसूल अधिकारी श्री. दिपक खैरनार उपस्थित होते.
पिंप्रीसह आठ सजांचा समावेश
रावेर तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील अनुसूचित क्षेत्रातील मौजे पिंप्री येथे एक पद, तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील वाघोदा बु., निंभोरा बु., अजंदे, कोचूर बु., रायपूर, थेरोळे, रावेर आणि तांदलवाडी या आठ सजांमध्ये पदे रिक्त असल्याने एकूण ९ पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
संबंधित आरक्षण हे मागासवर्गीय कक्ष तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडून मंजूर बिंदूनामावलीनुसार आणि सन २०११ च्या जनगणनेतील संबंधित सजांच्या प्रवर्गनिहाय लोकसंख्येचा विचार करून निश्चित करण्यात आले आहे.
सजेनिहाय आरक्षण असे
अ.क्र.| सजाचे नाव| निश्चित झालेले आरक्षण
१| पिंप्री (अनुसूचित क्षेत्र)| अराखीव
२| थेरोळे| अनुसूचित जाती (महिला)
३| कोचूर बु.| अनुसूचित जाती
४| अजंदे| भटक्या जमाती – ब (भ.ज.ब)
५| रावेर| भटक्या जमाती – ड (भ.ज.ड)
६| तांदलवाडी| इतर मागास वर्ग (इ.मा.व.)
७| वाघोदा बु.| इतर मागास वर्ग (महिला)
८| निंभोरा बु.| SEBC
९| रायपूर| EWS
अनुसूचित जाती व इतर मागास वर्ग या प्रवर्गांतील महिला आरक्षणाच्या जागा, तसेच SEBC आणि EWS या दोन्ही प्रवर्गांचे आरक्षण संबंधित सजांच्या नावांची चिठ्ठी काढून पारदर्शक पद्धतीने निश्चित करण्यात आल्याचेही प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवरांसमक्ष पारदर्शक पद्धतीने सोडत
सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक व नि:पक्षपाती पद्धतीने, उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या समक्ष पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता संबंधित पदांच्या भरती प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून पुढील भरती प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येणार आहे.

No comments