चोपडा शहरात गणेशोत्सव २०२६ उत्साहात व शांततेत संपन्न; विसर्जनानंतर नगरपरिषदेकडून पहाटेपासून स्वच्छता मोहीम मेन रोड गुलाल जमा करताना स्वच्छता...
चोपडा शहरात गणेशोत्सव २०२६ उत्साहात व शांततेत संपन्न; विसर्जनानंतर नगरपरिषदेकडून पहाटेपासून स्वच्छता मोहीम
मेन रोड गुलाल जमा करताना स्वच्छता कर्मचारी विभाग नंबर १ व पाहणी करताना विभाग प्रमुख राठोड साहेब व स्वच्छता निरीक्षक जयेशभोंगे सोबत मुकादम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव २०२६ मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोपडा नगरपरिषद प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. तसेच गटारींवर आवश्यक ठिकाणी ढापे ठेवण्यात आले होते. तापी पुलावर तसेच चहार्डी खदान येथे गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभतेने करता यावे, यासाठी बॅरिकेडिंग व क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून नगरपरिषद कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील 3 ठिकाणी कृत्रिम तलावाची गणपती विसर्जनाकरीता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोय करण्यात आली होती. असून यामध्ये एकूण 248 मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले तसेच निर्माल्य संकलनाकरीता छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, आशा टॉकीज येथे याठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा शहरातील विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. शहरातील तमाम गणेश मंडळे, मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी चोपडा नगरपरिषदेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज कासमोर भव्य स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवर नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, नगरसेविका सौ. नेहा जैन, आरोग्य सभापती श्री. रमेश ग्यानोबा शिंदे, मुख्याधिकारी श्री. विवेक धांडे तसेच नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व अधिनस्त कर्मचारी यांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा नारळ, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार समारंभ रात्री ०३-०० वाजेपर्यंत सुरू होता. *यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी चोपडा शहरातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक सजावट व स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्यास चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.*
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चोपडा शहराची ओळख असलेल्या ‘गुलाल किंग’ परंपरेनुसार गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण केली. त्यामुळे मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात गुलाल जमा झाला होता. या र्श्वभूमीवर मा. मुख्याधिकारी श्री. विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ०४.०० वाजेपासून मिरवणूक मार्गाची साफसफाई सुरू करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ८० ते ११० सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील गुलाल व इतर कचरा संकलित करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे १२ ट्रॉली गुलाल संकलित करण्यात आला व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
*याप्रसंगी मा. मुख्याधिकारी श्री. विवेक धांडे यांनी चोपडा शहरातील नागरिकांना पुढील वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणपूरक असावी, मिरवणुकीदरम्यान गुलालाऐवजी फुलांचा वापर करण्यात यावा तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.* गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यामध्ये उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर, कर अधीक्षक श्री. संदिप गायकवाड, कर निरीक्षक श्री. प्रणव पाटील, विद्युत अभियंता श्री. प्रमोद पाटील, नगर अभियंता श्री. डिगंबर वाघ, पा.पु. अभियंता श्री. जितेंद्र मोरे, स्वच्छता निरीक्षक श्री. वसंत राठोड, श्रीमती दिपाली साळुंके, श्री. जयेश भोंगे, लेखापरीक्षक श्री. चेतन गडकर, लेखापाल श्री. मयुर शर्मा, मिळकत व्यवस्थापक श्री. संजय ढमाळ, नगर रचनाकार श्री. चेतन अहिरराव, शहर समन्वयक श्री. स्वप्निल धनगर तसेच स्वच्छता विभागातील मुकादम व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. चोपडा नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनबद्ध उपाययोजना, अधिकारी-कर्मचारी यांचे परिश्रम तसेच गणेश मंडळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव २०२६ आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



No comments