चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन; प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित तिन्ही वसतिगृहांतील ३१ मागण्यांवर मुदतीत कार...
चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन; प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
तिन्ही वसतिगृहांतील ३१ मागण्यांवर मुदतीत कार्यवाहीचे आश्वासन; मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह (जुने) येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित समस्या व मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी 18 सप्टेंबर रोजी तिन्ही शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आंदोलन केले. वसतिगृहातील भोजन, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, निवास व्यवस्था, सुरक्षा, क्रीडा साहित्य, संगणक सुविधा, नाश्ता, पाणी तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी जयेश पावरा व किरण पावरा यांनी केले. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर नाशिक येथून विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सागर पावरा व राहुल पावरा चोपडा येथे दाखल झाले. त्यांनी तिन्ही वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांच्या समस्या, अडचणी व मागण्यांचा आढावा घेतला. तसेच संबंधित विद्यार्थ्यांसोबत प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामा भाऊ पावरा हे देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये एकूण 31 विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण भोजन मिळावे, शासनाच्या DBT संदर्भातील रक्कम वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, वसतिगृहातील नाश्त्याची योग्य व्यवस्था करावी, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वसतिगृहांची प्रवेशक्षमता वाढवावी, स्वच्छता व शौचालयांची दुरुस्ती करावी, गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संगणक उपलब्ध करून द्यावेत, स्वतंत्र व सुसज्ज ग्रंथालयाची सुविधा करावी, क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे, वैद्यकीय व सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.
तसेच वसतिगृह परिसराची नियमित स्वच्छता, खराब झालेल्या शौचालयांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वेळापत्रक, पालकांना भेटण्याची सुविधा, नवीन इमारतीची उपलब्धता, प्रवेशक्षमता वाढविणे, सुरक्षा रक्षक व सफाई कामगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा आदी मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आंदोलनस्थळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मागण्यांवर एका आठवड्याच्या आत, तर उर्वरित कामांवर एका महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, ठरवून दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता व वसतिगृहातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे. तसेच पुढील आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची व प्रकल्प अधिकाऱ्यांची असेल, अशी भूमिका विद्यार्थी प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान मांडली.
“लेखी आश्वासनानुसार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठरलेल्या मुदतीत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल,” अशी भूमिका विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

No comments