चोपड्याच्या काव्यांजली पाटीलची आंतरराष्ट्रीय गणेशमूर्ती प्रदर्शनासाठी निवड चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा : येथील ...
चोपड्याच्या काव्यांजली पाटीलची आंतरराष्ट्रीय गणेशमूर्ती प्रदर्शनासाठी निवड
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. काव्यांजली अनिलराज पाटील हिने शाडू मातीपासून साकारलेल्या सुंदर गणेशमूर्तीची उत्तराखंडमधील नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ या सांस्कृतिक संस्थेमार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव बाल मूर्तिकार म्हणून काव्यांजली पाटील हिने चोपडा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सन २०२६ च्या गणेशोत्सवानिमित्त ‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या वतीने श्री गणेशाच्या मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातून शालेय विद्यार्थी आणि विविध कलावंत आपल्या कलाकृती सादर करीत आहेत. या प्रदर्शनासाठी अनेक गणेशमूर्तींची निवड करण्यात आली असून, दि. २६ सप्टेंबर २०२६ पासून प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.
काव्यांजलीने शाडू मातीपासून गणपती बाप्पाची आकर्षक व सुबक मूर्ती स्वतःच्या हाताने साकारली आहे. तिच्या या कलाकृतीची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन व स्पर्धेसाठी झाल्याने चोपडा शहरासह तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या फाऊंडर व अध्यक्षा चित्रकार डॉ. पूनम तसेच संस्थेच्या संपूर्ण समितीने काव्यांजलीच्या कलाकृतीची निवड करून तिचे अभिनंदन केले असून, पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काव्यांजलीला लहानपणापासूनच माती कामाची विशेष आवड आहे. ती आपल्या वडिलांना गणेशमूर्ती रंगविण्यासाठी मदत करते. तसेच अभ्यासासोबतच घरी विविध प्रकारची मातीची भांडी व कलाकृती तयार करण्याचा छंद ती जोपासत आहे. यापूर्वीही तिने चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पुरस्कार मिळविला आहे.
काव्यांजलीच्या या कलागुणांना तिच्या आईचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळत असून, तिच्या कुटुंबीयांकडूनही तिला प्रोत्साहन दिले जात आहे. न्यूरोलॉजिस्ट हेमराज पाटील सर यांची ती पुतणी आहे. तिच्या वर्गशिक्षिका वैद्य मॅडम यांनीही काव्यांजलीच्या कलागुणांचे कौतुक करून तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अवघ्या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या काव्यांजलीने आपल्या कल्पकतेला मातीच्या माध्यमातून आकार देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनापर्यंत मजल मारल्याने तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments