गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन ध्वनिप्रदूषण, मिरवणूक व विसर्जनाबाबत १५ नियम जारी; नियमभंग केल्यास का...
गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन
ध्वनिप्रदूषण, मिरवणूक व विसर्जनाबाबत १५ नियम जारी; नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये पोलिस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गणेश मंडळांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार, विसर्जनाच्या आदल्या दिवशी कोणत्याही मंडळाने डीजे किंवा मोठ्या आवाजाची यंत्रणा लावू नये. गणेश मंडपाचा आकार रस्त्याच्या रुंदीच्या मर्यादेत ठेवावा. गणेशमूर्ती, मंडप व मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या जनावरांच्या संरक्षणाची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी घ्यावी.
मंडपासाठी कायदेशीररीत्या वीज कनेक्शन घेणे, आग प्रतिबंधक उपाययोजना करणे तसेच आवश्यक ठिकाणी वाळू व पाण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंडपातील विद्युत जोडणी तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घेण्यास सांगण्यात आले असून जनरेटर, बॅटरी व इतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आहेत.
ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करण्याबाबतही पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रुग्णालये, दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालये व शासकीय कार्यालयांच्या परिसरात ध्वनिक्षेपकांचा वापर टाळावा. तसेच गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत स्वयंसेवकांनी मद्यसेवन करून सहभागी होऊ नये, असेही बजावण्यात आले आहे.
मंडपात किंवा परिसरात सापडलेल्या संशयित बेवारस वस्तू, स्फोटकासारख्या वस्तू किंवा संशयास्पद साहित्याला हात न लावता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. मिरवणुकीदरम्यान सुरक्षित अंतर राखावे आणि मंडपाच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात कोणतेही वाहन पार्क करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वर्गणी गोळा करताना नागरिक व व्यापाऱ्यांकडून ऐच्छिक स्वरूपात वर्गणी घ्यावी, जबरदस्ती करू नये. गणेश मंडपाकडे पोलिसांचे वाहन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांना आपत्कालीन परिस्थितीत पोहोचण्यास अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाच्या व गर्दीच्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे रेकॉर्डिंग जतन करावे, तसेच मंडप व गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेऊन त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी गणेश मंडळाची राहील, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती रस्त्यावर सोडून जाणार नाही, याचीही मंडळांनी दक्षता घ्यावी. वरील नियमांचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरील नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते, असा इशारा चोपडा शहर पोलिसांनी दिला आहे.

No comments