बाप्पा आनंदाचा… त्रासाचा नाही!’ कर्कश डीजे नको, गुलालाची उधळण नको; आगमन व विसर्जन मिरवणुकीत फुलांचा वर्षाव करा! चोपड्यात शंभर विद्यार्थ्यां...
बाप्पा आनंदाचा… त्रासाचा नाही!’ कर्कश डीजे नको, गुलालाची उधळण नको; आगमन व विसर्जन मिरवणुकीत फुलांचा वर्षाव करा!
चोपड्यात शंभर विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षकांना पोस्टकार्ड पाठवून गणेश मंडळांना दिला संवेदनशील संदेश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा! मात्र या उत्सवाचा आनंद इतरांच्या त्रासाचे कारण ठरू नये, याची जाणीव चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांनी समाजाला करून दिली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नावे पोस्टकार्ड लिहून कर्कश ध्वनीला आळा घालण्यासह डीजे टाळावा आणि गुलालाची अतिप्रचंड उधळण करण्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करावा, अशी हृदयस्पर्शी विनंती केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पोस्टकार्डमध्ये गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यावेळी तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, अशी मागणी केली आहे. पारंपरिक वाद्ये किंवा वाजंत्री असली तरी त्यांचा आवाजही मर्यादित असावा, जेणेकरून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कानांना व आरोग्याला कर्कश आवाजाचा त्रास होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी गुलालाच्या अतिप्रचंड उधळणीऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून बाप्पाचे स्वागत आणि निरोप द्यावा, अशी आगळीवेगळी विनंती केली आहे. गुलालामुळे होणारा त्रास, रस्त्यावर निर्माण होणारी अस्वच्छता आणि मिरवणुकीतील अनावश्यक धुरळा टाळून फुलांच्या पाकळ्यांनी भक्ती, सौंदर्य आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा संदेश या लहानग्यांनी दिला आहे. ‘बाप्पाच्या भक्तीत आवाजाचा अतिरेक कशासाठी? उत्सवाच्या आनंदात दुसऱ्यांचा त्रास कशासाठी?’ असा जणू थेट सवालच विद्यार्थ्यांनी आपल्या पोस्टकार्डच्या माध्यमातून गणेश मंडळांना केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा बोर्ड गणेश मंडळांना दाखवणार:- या उपक्रमाचे कौतुक करताना चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले म्हणाले, “विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. मात्र त्यांनी ही पोस्टकार्डे शहरातील जवळपास ७० ते ८० गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पाठवून कर्कश आवाजाचा विषय थेट त्यांच्या निदर्शनास आणून देणे अधिक प्रभावी ठरेल.” “तरीही विद्यार्थ्यांचे पोस्टकार्ड मला प्राप्त झाल्यानंतर संबंधित सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून ही पोस्टकार्डे एका बोर्डवर लावण्यात येतील. या लहानग्या विद्यार्थ्यांच्या भावना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल,” असेही निरीक्षक देसले यांनी सांगितले. लहानग्यांनी दिला मोठ्यांना विचार करण्याचा संदेश:- महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक एम. एस. पाटील यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःहून व्यक्त केलेल्या या भावना केवळ गणेशोत्सवापुरत्या मर्यादित नसून ‘आपला आनंद दुसऱ्याच्या त्रासाचे कारण ठरू नये’, या सामाजिक जाणिवेचा संदेश देणाऱ्या आहेत. आज मोठमोठ्या डीजेच्या आवाजात भक्तीचा आवाज हरवतो आणि गुलालाच्या उधळणीत उत्सवाचे सौंदर्य झाकोळले जाते. अशा परिस्थितीत शंभर विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून मांडलेली ही छोटीशी विनंती मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे. गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर भक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक विचारांचा उत्सव व्हावा, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य व संवेदनशील उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य तथा सहसचिव डॉ. संध्या सोनवणे यांच्यासह समाजातील जागरूक नागरिकांनी विद्यार्थी, मुख्याध्यापक व उपशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



No comments