नगरचे ज्येष्ठ उर्दू शायर ग़नी मोहम्मद ग़नी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक स्मरण ग़नी मोहम्मद ग़नी यांच्या आद्य रचनांमध्ये प्रामुख्याने मनकेब...
नगरचे ज्येष्ठ उर्दू शायर ग़नी मोहम्मद ग़नी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक स्मरण
ग़नी मोहम्मद ग़नी यांच्या आद्य रचनांमध्ये प्रामुख्याने मनकेबत आणि नात आढळून येतात
अहिल्यानगर (अहमदनगर) प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
ही जशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसाच साहित्य क्षेत्रातील अहमदनगर चा इतिहास हा जुना आहे. आज आपण त्याच अनुषंगाने अहमदनगर / अहिल्या नगर चे एक ज्येष्ठ उर्दू शायर ग़नी मोहम्मद ग़नी यांचे बद्दल जाणून घेणार आहोत.
स्वातंत्र्यपूर्व काळात १६ जुन १९३६ रोजी जन्मलेले प्रसिद्ध उर्दू शायर ग़नी मोहम्मद ग़नी. यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले. अगदी लहान वयातच पितृछत्र हरपल्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड देत शिक्षण घेणं जिकिरीचं होतं. त्यामुळे लहान वयातच त्यांना शिक्षणाबरोबर मेहनतीची कामे सुद्धा करावी लागली. लहानपणापासूनच त्यांना खेळ, चित्रकला आणि उर्दू साहित्यामध्ये खुप रस होता. परंतु आर्थिक अडचणी मुळे त्यांना परिघात अडकून रहावं लागलं. सुप्रसिद्ध शायर अख़्तर हुसैन अख़्तर ( अख़्तर मास्टर ) हे ग़नी साहेबांचे मामा असल्याने, उर्दू साहित्यामध्ये त्यांना मामांचं पाठबळ आणि साथ मिळाली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी मुशायरा मध्ये सहभाग घेऊन आपल्या रचना सादर केल्या होत्या. त्यांच्या आद्य रचनांमध्ये प्रामुख्याने मनकेबत आणि नात आढळून येतात. ज्यामध्ये अल्लाह आणि रसुलल्लाह यांची स्तुती आणि महती दिसून येते. एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर मध्ये मुशायरा संपन्न झाला होता. त्यामध्ये आपल्या रचना सादर करण्याचा मान ग़नी साहेबांना मिळाला होता. ग़नी साहेब यांचे मामेभाऊ आणि अख़्तर मास्टर यांचे सुपुत्र डॉ. मिर्झा मोहम्मद ख़िजर यांना अहमदनगर च्या सुफी संताचा इतिहास या शोधनिबंधासाठी पी. एच्. डी. या उपाधिने गौरविण्यात आले होते.
ग़नी साहेबांनी साहित्यावर काम करतानाच राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागात ३९ वर्षे अखंडित सेवा दिली. या सेवेत त्यांनी मुळा धरण, संगमनेर, भंडारदरा, मिरजगांव, नांदूर मध्यमेश्वर आणि अहमदनगर या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला. कामातील कौशल्यामुळे त्यांना ASI ( Archaeological Survey of India ) यांचेकडून विशेष सेवा म्हणून हैदराबाद येथे काही काळ सेवा करण्याची संधी मिळाली.
अहमदनगर शहराला तशी उर्दू साहित्याची खुप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथल्या मातीत खुप किर्तीवान शायर होऊन गेले. त्यात प्रामुख्याने सर्वश्री मुन्शी उम्मीद, जोश मलिहाबादी, आशना साहब, अफ़सर सिमाबी, फ़लक़ रुमान, अख़्तर हुसैन अख़्तर, हाक़िम अज़गर अली, ख़लिल मुजफ्फर, हिम्मत अहमदनगरी, अब्दुल सत्तार मुज़मीर या श्रुंखलेतील शेवटची कडी होते ते ग़नी मोहम्मद ग़नी साहेब. त्यानंतर अहमदनगर शहराचा उर्दू साहित्याचा सुवर्णकाळ जवळपास संपुष्टात आला होता. परंतु त्यानंतर चालू दशकामध्ये डॉक्टर क़मर सुरुर यांनी पुन्हा उर्दू साहित्यामध्ये अहमदनगर शहराला नवसंजीवनी देण्याचे, तसेच अहमदनगर चे उर्दू साहित्य जगभरात पोहचवण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
श्री. ग़नी मोहम्मद ग़नी विविध सामाजिक विषयांवर कविता केल्या. त्यांच्या काही रचना खुप गाजल्या... त्यापैकी,
*सुख़े पत्तों को हिकारत से न देखों यारों !*
*ये जो जलते हैं, तो जंगल को जला देते हैं !!*
या रचनेत प्रामुख्याने आजच्या युगात वृद्ध व्यक्तिंची जी अवहेलना होते, याविषयी हळहळ आणि चिंता व्यक्त केलेली दिसून येते. तसेच याचे दुष्परिणाम देखील अधोरेखित करण्यास ग़नी साहेब याठिकाणी विसरले नाहीत.
*तिनके तिनके से आशियां हैं बना !*
*जर्रे भी रायग़ा नहीं होते !!*
या काव्यामध्ये ग़नी साहेबांनी अगदी शुल्लक मानल्या जाणाऱ्या कस्पटाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. चिमण्या आणि पक्षी अशा कस्पटापासून आपली घरटी बनवतात आणि त्या मधुन नवीन पिढीचं भविष्य लिहीलं जातं. अशा लहान लहान गोष्टी आपल्या भावना पुर्ण नजरेतून टिपून आपल्या शैलीत श्रोत्यांना भुरळ घालतील अशा पद्धतीने मांडल्या. मुशायरा मध्ये आपल्या दिलखुलास अंदाजात शायरी केल्यामुळे दिर्घकाळ त्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
*या रब तसव्वुरात को इतनी रसाई दे !*
*हर सिम्त मुझको गुंबदे ख़िज़रा दिखाई दे !!*
*सज़दे में सर झुकाऊं तो काबा नज़र में हों !*
*सज़दे से सर उठाऊं, तो मदिना दिख़ाई दे !!*
या त्यांच्या रचनेमध्ये अल्लाह वर आणि पैगंबर साहेबांवर असणारी त्यांची निस्सीम श्रद्धा आणि आस्था दिसून येते. खासगी जीवनात अतिशय विनम्र असणारे, अध्यात्माची गोडी असणारे, अल्लाह आणि त्याच्या रसुलवर प्रचंड श्रद्धा असणारे, नियमित कुरान आणि नमाज़ पठण करणारे, प्रसन्न, प्रफुल्लित, अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. *सुना हैं आसमां से आज कोई बर्क टुटेगी !*
*इसी ख़ातिर नशेमन और ऊंचा कर लिया मैंने !!*
या रचनेत ग़नी साहेबांचा अल्लाह वर / परमेश्वरावर असणारा अतूट विश्वास दिसून येतो. भौतिक संकटांना न घाबरता, बिकट परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करण्याचा आत्मविश्वास दिसून येतो.
या व अशा अनेक श्रवणीय रचनांमुळे उर्दू साहित्यामध्ये ग़नी साहेबांचं नावं आदराने कायमचं घेतले जाईल. सगळ्यांना कायम हसतमुखाने भेटणारे, मस्जिद च्या ओट्यावर हमखास दिसणारे, अगदी लहानग्यांना कोणताही गर्व, आविर्भाव न ठेवता स्वतःहून भेटणारे, न मागता आशिर्वाद देणारे ग़नीसाहेब, म्हणजे ग़नीभाई, म्हणजेच माझे अब्बा यांना २६ सप्टेंबर २०२२ रोजी देवाज्ञा झाली. मला आठवतं अब्बांसोबत गप्पाची महेफल रंगली की अब्बा आपल्या आवडीच्या शायर चे खुप सुंदर सुंदर शेर सांगायचे, कधी कधी अख़्तर मास्टर यांचे कधीही न ऐकलेले शेर आठवायचे अब्बांना ! मी अशा वेळी कायम त्यांनी सांगितलेले शेर लिहून घेत असतं, कारण ते कुठल्याच पुस्तकात सापडणारे नसायचे. आणखी रंगात आणण्यासाठी मी सुद्धा काही शेर सांगत असे. शेवटी थोडी तब्येत घसरली होती. तेव्हा त्यांनी सांगितले दोन शेर माझ्या कायम स्मरणात राहतील.
*सदमें सहे जाता हूं मगर उफ्फ नहीं करता !*
*पत्थर का कलेजा मुझे बख़्शा हैं खुदा ने !!*
*सिमाब किस ने अर्श से आवाज़ दी मुझे !*
*कहे दो के इंतजार करे, आ रहा हूं मैं !!*
असे होते माझे अब्बा ! त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरुन येणारी आहे. अब्बांना श्रद्धांजली वाहण्या इतके सामर्थ्यवान शब्दचं तयार झालेले नाहीत. तरी सुद्धा जाता जाता इतकचं म्हणेण...
*तेरे अख़लाक पता देते हैं तेरी बुलंदी का !*
*तेरा झुक के मिलना बताता है, के आसमां है तू !!*
--------------------------------------------
*संकलन:*
इंजि. अनिस ग़नी मोहम्मद शेख -
9850900786 / 8788201155
--------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार अबीदखान - अ.नगर
-------------------------------------------
*लेख प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर-9561174111

No comments