चोपडा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी — किसान काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी चोपडा प्रतिनिधी (संपादक...
चोपडा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी — किसान काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चोपडा तहसील कार्यालय येथे तहसीलदार मा. भाऊसाहेब थोरात साहेब यांना निवेदन देण्यात आले. विशेषतः कापूस पिकावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीन व मका पिकांनाही कमी पावसाचा मोठा फटका बसला असून उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती व मदत तातडीने देण्यात यावी,
कापूस पिकावर झालेल्या लाल्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना सहानुग्रह अनुदान/नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच सोयाबीन व मका पिकांचे कमी पावसामुळे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्याद्वारे निश्चित करून शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
खरीप हंगामातील उत्पादनात झालेली मोठी घट लक्षात घेऊन विशेष आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च लक्षात घेऊन शाळा व महाविद्यालयांच्या फीमध्ये शासनामार्फत सवलत अथवा शैक्षणिक शुल्क माफी देण्यात यावी. आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून द्यावीत,
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक भार लक्षात घेऊन पीककर्ज व इतर कृषी कर्जाबाबत शासनाच्या नियमानुसार सवलत अथवा स्थगिती देण्यात यावी.
शेतकऱ्यांना मदत देताना कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी पारदर्शक पद्धतीने पंचनामे व नुकसान नोंदणी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना तातडीने शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी व आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवावा,” अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशबापू पाटील, तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, मधुकर बाविस्कर, धनंजय पाटील,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे,जिल्हा सचिव आरिफ शेख, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, शरद धनगर, संदीप पाटील,प्रकाश पाटील, देविदास पाटील, माणिक पाटील, दीपक चौधरी,नवाब तडवी, जहागीर पठाण, गोपाल धनगर, विजय पाटील, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, नरेंद्र पाटील, गफार आली, नितेश पाटील, देविदास साळुंखे,अल्पसंख्यांख शहर अध्यक्ष इलियास पटेल, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोळी, उखा बारला ,सागर चव्हाण, श्रीकांत बारेला, रोहिदास बारेला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments