माझा समुदाय आज इथपर्यंत पोहोचला, मी आजही भिक्षुकी करते, हा विषय पैशांचा नव्हे, माझ्या अस्तित्वाचा : सई भराट कमलेश शेवाळे सहसंपादक (संपाद...
माझा समुदाय आज इथपर्यंत पोहोचला, मी आजही भिक्षुकी करते, हा विषय पैशांचा नव्हे, माझ्या अस्तित्वाचा : सई भराट
कमलेश शेवाळे सहसंपादक
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माझा समुदाय अत्यंत संघर्षातून आज इथपर्यंत पोहोचला आहे. मी आजही भिक्षुकी करते. हा विषय पैशांचा नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे. मला तृतीय क्रमांकाचे स्थान दिले जाते. पण प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर कोण आहे? हे क्रमांक ठरवणारे कोण? मीसुद्धा तुमच्यासारखाच आहे. मी तुमचाच एक भाग आहे. मी वेगळा नाही. माझे मन, माझ्या भावना आणि माझ्या संवेदना तुमच्यासारख्याच आहेत. तुमच्याकडून माझ्याकडे पाहण्याची एकतर्फी दृष्टी असणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. काही लोक मला वेगळ्या वर्गात ठेवतात. अशा वेळी मला त्यांना विचारावेसे वाटते, जर मी तिसऱ्या वर्गातला असेन, तर पहिल्या वर्गात कोण आहे? स्त्री की पुरुष? आणि प्रत्येक व्यक्तीचा वर्ग ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे मत तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक म्हणून ओळख असलेल्या केशव प. शंखनाद पथकाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक सन्मानासाठी तसेच धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांना 'केशव सन्मान पुरस्कार २०२६' टिळक रस्त्यावरील स. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. चिदंबरमेश्वर महाराज साखरे (श्री गुरु साखरे महाराज साधक आश्रम, आळंदी) तसेच केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन,
किशोर चव्हाण, पथकाचे सचिव रणजीत हगवणे, काळूराम डोमाळे, शीला गिरमे, अरुण कापसे, सुहास मदनाल, प्रमोद डोंगरे, शैलेंद्र भालेराव, महेंद्र बेचवडे यांच्यासह पथकाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
या वेळी सई भराट म्हणाल्या, जिथे कुठे अन्याय किंवा चुकीची घटना घडत असेल आणि माझ्या लक्षात येत असेल, तिथे त्याविरोधात आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे. जी व्यक्ती भिक्षुकी करते, तिने प्रत्येकाच्या दारात जाऊन धर्माची बाजू मांडणे, धर्माबद्दल सांगणे आणि धर्माचा विचार पुढे नेणे, हेच खरे धर्मकार्य आहे.'

No comments