विटनेर येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच दिवसाढवळ्या पाळीव जनावराची शिकार; शेतकरी, ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद कर...
विटनेर येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच
दिवसाढवळ्या पाळीव जनावराची शिकार; शेतकरी, ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशत
पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी; ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा
मच्छिंद्र रायसिंग गलंगी, ता. चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील विटनेर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असून, दिवसाढवळ्या पाळीव जनावराची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी उपसभापती सुभाष लोटन कोळी यांच्या गावाजवळील गोठ्यातील गाईच्या बछड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे विटनेरसह अनेर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून विटनेर परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने जाणवत आहे. यापूर्वीही या भागात वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता दिवसाढवळ्या बिबट्याने जनावराची शिकार केल्याने शेतकऱ्यांमध्ये अधिकच दहशत निर्माण झाली आहे. शेतात काम करण्यासाठी जाणे, जनावरे चरायला सोडणे तसेच सायंकाळनंतर शेतातून घरी परतणे याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा
घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असून, संबंधित परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवावेत तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावराच्या मालकाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.
महसूल व वनविभागाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात दोन व्यक्तींचा जीव थोडक्यात बचावला होता. या घटनेनंतर आता बिबट्याच्या वावरामुळे अनेर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाने नियमित गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बिबट्या हा हिंस्र वन्यप्राणी असून, त्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी घाबरून न जाता मात्र अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी—
- रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास समूहाने व पुरेशा प्रकाशात जावे.
- लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना एकटे बाहेर पाठवू नये.
- रात्री शेतात किंवा घराबाहेर जाताना टॉर्चचा वापर करावा.
- झुडपे, केळी, ऊस व दाट गवताच्या परिसरात विशेष सावधगिरी बाळगावी.
- पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बंदिस्त ठेवावीत.
- बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, पाठलाग करू नये किंवा त्याला घेरू नये.
- बिबट्या दिसल्यास गर्दी न करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.
- फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी बिबट्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.
- बिबट्या समोर आल्यास घाबरून धावत सुटू नये; शांत राहून हळूहळू सुरक्षित अंतरावर जावे.
- अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती पसरवू नये.
“बिबट्या सामान्यतः माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला त्रास न देता सुरक्षित अंतर राखणे आणि तात्काळ वनविभागाला माहिती देणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे.”
— विजय जी. शिरसाठ, वनरक्षक, लासूर, चोपडा वनक्षेत्र
मार्गदर्शन : बी. डी. कूवर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा प्रादेशिक

No comments