adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फायर फायटिंग’साठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय सज्ज! डॉ. प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने डॉक्टरांसह कर्मचारी, नातेवाईक व नागरिकांना अग्निशामक यंत्राचे प्रशिक्षण

फायर फायटिंग’साठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय सज्ज! डॉ. प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने डॉक्टरांसह कर्मचारी, नातेवाईक व नागरिकांना अग्निशामक यंत...

फायर फायटिंग’साठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय सज्ज!

डॉ. प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने डॉक्टरांसह कर्मचारी, नातेवाईक व नागरिकांना अग्निशामक यंत्राचे प्रशिक्षण 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा  : रुग्णालयात अचानक आग लागल्यास निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ अग्निशामक यंत्रे उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर त्यांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करता येणे आवश्यक आहे. याच उद्देशाने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात चोपडा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने अग्निसुरक्षेबाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद पाटील यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुग्णालय परिसरात आग लागण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध असलेल्या अग्निशामक साधनांचा आपत्कालीन प्रसंगी प्रभावी वापर कसा करावा, याची माहिती यावेळी देण्यात आली. 


अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष आग निर्माण करून ती अग्निशामक यंत्राच्या मदतीने कशा पद्धतीने नियंत्रित करावी, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले. यंत्र हाताळताना कोणती काळजी घ्यावी, आगीच्या जवळ जाताना कोणती खबरदारी घ्यावी आणि सुरुवातीच्या काही क्षणांत आग आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावले उचलावीत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत मोठ्या संख्येने नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित असतात. त्यामुळे आगीसारखी आपत्कालीन घटना घडल्यास गोंधळ न करता परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामुळे उपस्थितांना अग्निशामक यंत्र प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव मिळाला. 


या प्रशिक्षणात रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक तसेच उपस्थित नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देत अग्निसुरक्षेबाबत आवश्यक सूचना दिल्या.

रुग्णालयातील अग्निशामक यंत्रे केवळ शोभेपुरती न राहता गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग करता यावा, यासाठी अशा प्रात्यक्षिकांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. उपक्रमासाठी चोपडा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments