बसस्थानक परिसर स्वच्छता आणि स्मारक भेटीतून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक : ह...
बसस्थानक परिसर स्वच्छता आणि स्मारक भेटीतून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्ताने चोपडा बसस्थानक परिसर स्वच्छता व स्मारक भेटीचे आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समजाप्रती समर्पण भाव व युवकांची ऊर्जा प्रगल्भ समाजनिर्मितीसाठी महत्वाची असते. महात्मा गांधीजीच्या विचारातून साकार झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा आज स्थापना दिवस हा दिवस महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या स्मारकांचे जतन व परिसराची स्वच्छता करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करून साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी चोपडा येथील बस स्थानक परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि महात्मा गांधी स्मारकास भेट देऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्मारक परिसरातील कचरा व अस्वच्छता दूर करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासो ॲड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव ताईसो स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता महाविद्यालयातून रॅली काडून झाली . या रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी ‘जात पात का बंधन तोडो भारत जोडो', ‘हम सब एक है‘ व 'भारत माता की जय' अशा विविध घोषणा देऊन चोपडा परिसरातील लोकांना एकीचा संदेश देत रॅली ची सुरवात केली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, डॉ. बी. एम. सपकाळ तसेच समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांची उपस्थिती होती. चोपडा बस स्थानकाचे आगार प्रमुख श्री. संदेश क्षीरसागर यांनी स्वयंसेवकांना बस स्थानकाची माहिती देऊन उपक्रमासाठी सहकार्य केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल हौसे यांनी महात्मा गांधीजीच्या विचारातून साकारलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेची पार्शवभूमी सांगितली. आज देखील या योजमेचा कार्यकरणभाव किती आवश्यक आहे याची माहिती दिली व या योजनेच्या माध्यमातूनच आजचा युवक उद्याचा प्रगल्भ भारत घडवतील असा आढावाद व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भेटी प्रसंगी स्वयंसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य, स्वराज्याची संकल्पना आणि समाजहिताची भूमिका व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाची पार्श्वभूमी याबाबत मार्गदर्शन केले.महिला सहायक कार्यक्रम अधिकारी सौ. सुनीता पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक समतेच्या विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. के. डी. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि स्वयंसेवकांची सामाजिक जबाबदारी याविषयी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित डॉ. प्रवीण महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून विद्यार्थ्यांना स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. धनश्री गाडीलोहर या स्वयंसेवीकेने याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले तर कल्याणी नाथबुवा या स्वयंसेविकेने आभार मानले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या स्मारकांना केवळ भेट देणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा आदर करणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे याचे महत्त्व समजले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
या उपक्रमाचे चोपडा येथील नागरिकांनी कौतुक केले.


No comments