adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पीएम श्री शाळा भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, खेळाचे मैदान नाही; शिक्षकांच्या खिशातून भाडे भरल्याची माहिती

पीएम श्री शाळा भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, खेळाचे मैदान नाही; शिक्षकांच्या...

पीएम श्री शाळा भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर.

९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, खेळाचे मैदान नाही; शिक्षकांच्या खिशातून भाडे भरल्याची माहिती




लातूर, जि. प्र (उत्तम माने )

(संपादक : हेमकांत गायकवाड)


निलंगा :- ‘पीएम श्री’ या नावाने शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचा विकास करण्यावर भर दिला जात असताना, निलंगा शहरातील पेठ भागातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ९७ विद्यार्थ्यांना मात्र आजही भाड्याच्या घरात शिक्षण घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या भाड्याचा आर्थिक भार कार्यरत शिक्षकांकडूनच उचलला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळेसाठी स्वतंत्र इमारत कधी मिळणार आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा कधी मिळणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

पेठ येथील ही शाळा १५ जून २०२५ पासून स्थानिक रहिवासी महादेव पटणे यांच्या घरात सुरू आहे. घरातील सुमारे १० बाय १० फूट आकाराच्या आठ खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग भरत आहेत. शाळेची इमारत अरुंद बोळात असल्याने पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे काही पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा परिणाम विद्यार्थीसंख्येवर होत असल्याची माहिती आहे.

९७ विद्यार्थी; सुविधा मात्र अपुऱ्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण ९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ४६ मुले आणि ५१ मुलींचा समावेश आहे. पहिलीमध्ये ९, दुसरीत ९, तिसरीत ११, चौथीत १४, पाचवीत १९, सहावीत २० आणि सातवीत १५ विद्यार्थी आहेत. चार शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक पद रिक्त आहे.

मात्र, या ९७ विद्यार्थ्यांसाठी मुला-मुलींसाठी एकच शौचालय असल्याची माहिती आहे. शाळेला स्वतंत्र खेळाचे मैदानही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा पुरेशा आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीएम श्रीचा दर्जा; मग सुविधा कुठे?

पीएम श्री शाळांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुरक्षित शालेय वातावरण, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा तसेच ग्रंथालय आणि क्रीडा सुविधांसारख्या बाबींना महत्त्व देण्यात आले आहे. विद्यमान शाळांच्या बळकटीकरणासाठी वर्गखोल्या, पाणी-स्वच्छतागृहे, क्रीडा क्षेत्र, दुरुस्ती, संरक्षक भिंत आदी पायाभूत सुविधांच्या विकासाचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर निलंग्यातील पीएम श्री शाळेची सद्यस्थिती प्रशासनाच्या पायाभूत सुविधा व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करते.

विद्यार्थ्यांना शाळा; शिक्षकांना भाड्याचा भार?

शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे. मात्र, शाळेची इमारतच भाड्याची आणि त्या भाड्याचा भार शिक्षकांच्या खिशातून उचलला जात असल्याची माहिती असेल, तर ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना शिक्षकांवर आर्थिक भार पडत असल्याची स्थिती किती काळ सुरू राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रव्यवहार झाला; चौकशी पुढे सरकणार कधी?

शाळेच्या स्वतंत्र इमारतीसंदर्भात तत्कालीन मुख्याध्यापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याचे मुख्याध्यापिका जोशी यांनी सांगितले. या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, चौकशी सुरू असल्यापलीकडे प्रत्यक्षात स्वतंत्र इमारतीच्या दिशेने ठोस निर्णय कधी होणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

९७ विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

शाळा भाड्याच्या घरात, अरुंद बोळात; स्वतंत्र मैदान नाही; ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय; एक शिक्षक पद रिक्त आणि भाड्याचा भार शिक्षकांकडून उचलला जात असल्याची माहिती—या सर्व बाबी एकत्रितपणे पाहता प्रशासनाने केवळ कागदोपत्री पत्रव्यवहार आणि चौकशीपुरते न थांबता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज आहे.


सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहू नये. ज्या मुलांच्या हातात उद्याचे भविष्य आहे, त्यांच्यासाठी आज सुरक्षित, स्वच्छ, प्रशस्त आणि सन्मानजनक शैक्षणिक वातावरण उभे करणे हीच खरी जबाबदारी आहे. त्यामुळे निलंगा पेठ येथील पीएम श्री शाळेला स्वतंत्र इमारत, आवश्यक स्वच्छतागृह सुविधा, खेळाची जागा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments