गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीत होण्यासाठी पोलीस अधीक्षकांना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, चोपडा तर्फे निवेदनाद्वारे मागणी चोपड...
गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीत होण्यासाठी पोलीस अधीक्षकांना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, चोपडा तर्फे निवेदनाद्वारे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन सोहळा तसेच विसर्जन मिरवणूक सुरळीत, सुरक्षित व शांततेत पार पडावी, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, चोपडा तालुका यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळेस सोबत डीवायएसपी सुनील पाटील व शहराचे पोलीस निरीक्षक पवन देसले उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळांकडून आगमन व विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी, विद्युत तारांचा अडथळा, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उत्सवापूर्वीच संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महामंडळाने केली आहे.
मिरवणूक मार्गाची पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे व अडथळे दूर करणे, विद्युत तारा व पोलची तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करणे, वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था करणे, तसेच मिरवणुकीदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच नगरपरिषद प्रशासनाने मिरवणूक मार्गावर स्वच्छता, कचरा संकलन व प्रकाश व्यवस्था करावी. विसर्जन स्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषद, महावितरण, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठक घेऊन मिरवणुकीचे मार्ग, वेळा, वाहतूक व्यवस्था, विद्युत सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर नियोजन करावे, अशी आग्रही मागणी महामंडळाने केली.
गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील. प्रशासन आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून चोपडा शहराचा गणेशोत्सव आदर्श व अनुकरणीय ठरविण्याचा संकल्प असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, चोपडा तालुका अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, गौरव सोनार, हरीश माळी, प्रेम घोगरे, अमोल भाट, विजय माळी, गिरीश भाट, अनिल वानखेडे, नरेश महाजन, शाम सोनार, जितेंद्र महाजन, सुनील बरडिया, अमृत सचदेव, जितेंद्र विसपुते, दिनेश जाधव, संदीप चव्हाण, विशाल भावसार, भूपेंद्र गुजराथी, विशाल भोई, दत्तू महाजन, आबा देशमुख, राजेंद्र पाटील (बिटवा), राजाराम पाटील, हितेंद्र देशमुख, कायदेशीर सल्लागार ऍड उमेश मराठे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments