शेतकऱ्यांच्या खरीप नुकसानीसाठी तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) महाराष्ट्रातील अनेक जिल...
शेतकऱ्यांच्या खरीप नुकसानीसाठी तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाचे अल्प प्रमाण तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघ, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन चोपडा तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.
निवेदनात खरीप हंगामातील नुकसान झालेल्या भांडवलासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट DBT पद्धतीने जमा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पुढील हंगाम सुरू करण्यासाठी किमान कार्यभांडवल उपलब्ध राहावे, तसेच पीक विमा नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. पीक नुकसानभरपाई मिळण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय वीज बिलांमध्ये सवलत/स्थगिती, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, पशुधनासाठी चारा व वैरण उपलब्ध करणे, नदी-नाले खोलीकरण व व्यापक जलसंधारण यांसारख्या उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज आकारणीला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भारतीय किसान संघाने शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन खरीप हंगामातील नुकसानीसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक निविष्ठा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील तालुका अध्यक्ष गोपाल महाजन. सुकलाल महाजन तालुका मंत्री. भगवान दगडू महाजन. सदस्य रवींद्र पाटील . राजेंद्र महाजन. गोपाल महाजन. समाधान पाटील. गोलू पाटील
निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments