पेसा भरतीतील पारदर्शकतेसाठी आदिवासी विकास परिषदेचा ७ दिवसांचा अल्टिमेटम तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर (संपादक : हेमकांत गायकवाड) यावल : पेस...
पेसा भरतीतील पारदर्शकतेसाठी आदिवासी विकास परिषदेचा ७ दिवसांचा अल्टिमेटम
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल : पेसा कायद्याची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करावी, पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे जाहीर करून नियमानुसार भरती करावी तसेच पेसा क्षेत्रात कार्यरत बिगर आदिवासी शिक्षकांच्या समायोजनाबाबत तातडीने कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जळगाव यांच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी यांना ७ दिवसांचे अल्टिमेटम देत चेतावणीवजा निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी आणि युवा प्रदेश उपाध्यक्ष रामदास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत अत्यल्प संख्या दर्शविण्यात आल्याचा दावा संघटनेने केला असून, शिक्षक भरती अनेक काळापासून रखडलेली असताना रिक्त पदे का दर्शविली जात नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
पवित्र पोर्टलसाठी रोस्टर भरणे, पेसा क्षेत्रातील कार्यरत बिगर आदिवासी शिक्षकांचे नियमानुसार समायोजन करणे आणि संबंधित शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेसा संवर्गातील रिक्त पदे ५० टक्के आरक्षणानुसार भरणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष मुराद तडवी, उपाध्यक्ष फिरोज तडवी, तस्लिम तडवी तसेच पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेले उमेदवार शकील तडवी, अशरफ तडवी, आरिफा तडवी, मेहेरबान तडवी, मदिना तडवी, छब्बीर तडवी, रेहाना तडवी आदी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी यांनी मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले. मात्र, सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे देण्यात आला आहे.

No comments