चोपडा बिटमध्ये २० ते २३ सप्टेंबरदरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन;आदिवासी विद्यार्थी दाखवतील आपले कसब चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकव...
चोपडा बिटमध्ये २० ते २३ सप्टेंबरदरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन;आदिवासी विद्यार्थी दाखवतील आपले कसब
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील चोपडा बिटनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन २० ते २३ सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २० सप्टेंबर रोजी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी तसेच रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धा कला, शास्त्र व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर, चोपडा येथे होणार आहेत. १४, १६ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सांघिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व हँडबॉल या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, मनवेल येथे होणार आहेत. १४ वर्षे वयोगटातील मुले-मुली तसेच १७ व १९ वर्षे वयोगटातील मुली या स्पर्धांमध्ये सहभागी होतील.
२३ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी सांघिक क्रीडा स्पर्धांचा पुढील टप्पा पार पडणार असून १९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व हँडबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धांमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव मिळणार असून खेळाडूवृत्ती, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होणार आहे.अशी भावना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे.यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धांसाठी उत्साहाने तयारी करत आहेत.
स्पर्धांचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संनियंत्रण समिती व तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा बिटमधील क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहेत.


No comments