“तुमचं संकट ते माझं संकट!” आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची आदिवासी बांधवांना भावनिक ग्वाही बडवानी, बढाई, नुरा वस्ती व शेवरेपाडा येथे भेट; ...
“तुमचं संकट ते माझं संकट!” आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची आदिवासी बांधवांना भावनिक ग्वाही
बडवानी, बढाई, नुरा वस्ती व शेवरेपाडा येथे भेट; अस्वल व कोल्ह्याच्या हल्ल्यातील जखमींची केली विचारपूस
चोपडा (संजीव शिरसाठ)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आज आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. मागील आठवड्यात बढाई येथे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले नाना बारेला व राकेश पावरा यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. अण्णांच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा तसेच छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना पुढील योग्य ती मदत मिळवून देण्याच्या सूचना आमदार सोनवणे यांनी दिल्या.
शेवरेपाडा येथे तीन वर्षांच्या बालकावर कोल्ह्याने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदारांनी त्या बालकाचीही पाहणी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत परिसरात गस्त वाढवणे, गरज पडल्यास पिंजरे लावणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
“मी तुमच्यातलाच आमदार आहे!”
यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले, “तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमचं दुःख ते माझं दुःख, तुमचं संकट ते माझं संकट आहे. मी तुमच्यातलाच आमदार आहे. मीसुद्धा एक आदिवासी बांधव आहे. तुमच्यासाठी केव्हाही मदत करण्यास तयार आहे. तुम्हाला भीती वाटत असेल, तर मी पुन्हा आठ दिवसांनी तुमची भेट घेण्यासाठी येईन.” त्यांच्या या आश्वासक शब्दांनी आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.
खडतर वाटेवरून आमदारांची पायपीट
या तिन्ही गावांना जाण्यासाठी अतिशय खडतर रस्ता असून अनेक ठिकाणी वाहन पोहोचणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत आमदार सोनवणे यांनी स्वतः पायी चालत, तर काही ठिकाणी वनविभागाच्या वाहनातून प्रवास करत आदिवासी बांधवांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि दुःखात सहभागी झाले.
अवघड क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या संकटात धावून जाणारा, स्वतःला जनतेतलाच एक मानणारा आमदार म्हणून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या संवेदनशील कार्याला सलाम!


No comments