adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर शहरातील अवैध सावकारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

  फैजपूर शहरातील अवैध सावकारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक; कठोर कारवाईची मागणी  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) ...

 फैजपूर शहरातील अवैध सावकारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक; कठोर कारवाईची मागणी 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरात सुरू असलेल्या कथित अवैध सावकारी आणि अवाजवी व्याजदराने पैशांची वसुली करण्याच्या प्रकारांना आळा घालावा, तसेच या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.

शहरात काही व्यक्तींकडून आवश्यक परवानगीशिवाय सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याची तसेच कर्जाच्या रकमेवर दरमहा १० ते २० टक्क्यांपर्यंत अवाजवी व्याज आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. कर्जाची वसुली करताना काही नागरिकांना धमकावणे, दमदाटी करणे, दादागिरी करणे आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित प्रकरणांची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाद्वारे फैजपूर शहरातील विनापरवाना सावकारी व्यवसायाची चौकशी करावी, अवाजवी व्याजदराने पैशांची वसुली करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, कर्जदारांना धमकावणाऱ्या व दमदाटी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, तसेच पीडित नागरिकांच्या तक्रारी गोपनीयतेने नोंदवून त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण व मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

फैजपूर शहरातील नागरिकांना अवैध सावकारीच्या जाचातून दिलासा मिळावा आणि अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच प्रत माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी मा. गृहमंत्री गृह विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक, मा. पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (डी वाय एस पी) फैजपूर विभाग यांना निवेदन रवाना करण्यात आले आहे.

No comments