श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेच्या लावण्या शिरसाठचे चित्रकलेत घवघवीत यश तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक; ‘बेटी बचाव, बे...
श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेच्या लावण्या शिरसाठचे चित्रकलेत घवघवीत यश
तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक; ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ विषयावरील चित्राला दाद
शामसुंदर सोनवणे वि.प्र:-
(संपादक : हेमकांत गायकवाड)
हातेड, ता. चोपडा, जि. जळगाव : समग्र शिक्षा अभियान, पंचायत समिती चोपडा यांच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता १ली ते ५वीच्या गटातून श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, हातेड येथील विद्यार्थिनी कु. लावण्या देविदास शिरसाठ हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या सामाजिक संदेशावर आधारित लावण्या हिने साकारलेल्या चित्रातून तिची कल्पकता, कलात्मकता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. फुलाच्या पाकळ्यांमध्ये आई, आजी, बहीण, डॉक्टर, शिक्षिका, पायलट अशा स्त्रीच्या विविध भूमिका तिने अत्यंत कल्पकतेने साकारल्या. तिच्या या कलाकृतीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या यशासाठी विद्यार्थिनीला श्रीमती रेखा अशोक पाटील, उपशिक्षिका, हातेड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रदीप बोरसे सर, खैरनार सर, अमृत पाटील सर आणि संदीप सनेर सर यांनीही विशेष मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख श्री. संदीप बाविस्कर सर यांनी विद्यार्थिनीला प्रोत्साहन देत तिच्या कलागुणांना प्रेरणा दिली.
लावण्या शिरसाठच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी तिचे तसेच तिच्या पालकांचे अभिनंदन केले. तिच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
लहान वयातच सामाजिक विषय प्रभावीपणे चित्रातून मांडत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या लावण्या शिरसाठचे यश हे शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

No comments