वढोदा येथे १९८५ पासून ‘एक गाव, एक देवी’ उपक्रमाची अखंड परंपरा! ४० वर्षांपासून नवरात्रोत्सव उत्साहात; शिरागड येथून पायी ज्योत आणण्याची परंप...
वढोदा येथे १९८५ पासून ‘एक गाव, एक देवी’ उपक्रमाची अखंड परंपरा!
४० वर्षांपासून नवरात्रोत्सव उत्साहात; शिरागड येथून पायी ज्योत आणण्याची परंपरा कायम
यावल प्रतिनिधी ;
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल- वढोदा प्र. यावल येथे सन १९८५ पासून ‘एक गाव, एक देवी’ या संकल्पनेतून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. संपूर्ण गावात एकाच ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना करून सामूहिक भक्ती, गावातील ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडविणारा हा उपक्रम गेल्या चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी कै. नारायण आप्पा सोनवणे यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या परंपरेला सुरुवात झाली. आज जय दुर्गा मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने जोपासली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत गावातील ग्रामस्थ व भाविक एकत्र येऊन देवीची पूजाअर्चा, सकाळ-संध्याकाळ आरती आणि नवसपूर्तीचे विधी भक्तिभावाने पार पाडतात. यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
शिरागड येथून पायी ज्योत आणण्याची परंपरा
वढोदा येथील नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे शिरागड येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातून अखंड ज्योत पायी आणण्याची परंपरा. यासाठी सुमारे ५० ते ५५ युवक पायी प्रवास करून ही ज्योत वढोदा येथे आणतात. श्रद्धा, समर्पण आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक असलेली ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा मंडळाचा मानस आहे.
धार्मिक विधींसोबतच मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकी आणि ग्रामएकतेचा संदेश देणारा ठरतो. संपूर्ण गावासाठी एकच देवीची स्थापना असल्याने सकाळ-संध्याकाळच्या आरतीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येतात.
ज्येष्ठांच्या पुढाकारातून परंपरेचे जतन
कै. नारायण आप्पा सोनवणे आणि नामदेव तुकाराम चौधरी यांनी ग्रामस्थांसाठी दुर्गामातेची मूर्ती अर्पण केली. कै. रामा बाविस्कर, कै. जनार्दन चौधरी, उत्तम बापू सोनवणे आणि सीताराम पाटील यांनीही या परंपरेच्या जतनासाठी परिश्रम घेतले.
यंदाही माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी वडिलांची परंपरा कायम ठेवत हा महोत्सव अखंड सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासाठी दिनकर सोनवणे, तुकाराम सोनवणे, यशवंत बाविस्कर, सरपंच संदीप सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी, राजेंद्र सोनवणे, लीलाधर सोनवणे, सुपडू सोनवणे, किरण सोनवणे, सोपान सोनवणे, सुनील सोनवणे, मुकेश चौधरी, नामदेव चौधरी, मुरलीधर चौधरी, चिंतामण भिल, कैलास सपकाळे तसेच पोलीस पाटील चेतन सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.
वढोदा येथील ‘एक गाव, एक देवी’ हा नवरात्रोत्सव म्हणजे श्रद्धा, एकात्मता आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. चार दशकांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून गावकऱ्यांमधील एकजूट अधोरेखित होत असून, पुढील पिढ्यांसाठीही ही परंपरा प्रेरणादायी ठरत आहे.

No comments