डीडीएसजीपी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि तंत्रज्ञ...
डीडीएसजीपी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि तंत्रज्ञानातील कौशल्यांवर भर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : एमजीएसएम संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, प्रात्यक्षिक कौशल्ये आणि सर्वांगीण विकास याबाबत पालक व शिक्षक यांच्यात संवाद साधणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. संध्या सोनवणे मॅडम आणि उपप्राचार्य प्रा. बी. एम. सपकाळ सर उपस्थित होते. प्राचार्य प्रा. संध्या सोनवणे यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि शैक्षणिक प्रगती याबाबत पालकांनी जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकांनीही आपली मते व सूचना मांडल्या. प्राचार्य आणि पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सकारात्मक व सुसंवादी चर्चा झाली.
इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कुणाल गायकवाड यांनी प्रास्ताविकातून पालक मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालय, शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय व सहकार्य असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत इलेक्ट्रॉनिक्सचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आधुनिक तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील करिअरच्या संधी यांविषयी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांची प्रात्यक्षिकेही सादर केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास दिसून आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपप्राचार्य प्रा. बी. एम. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून नियमित अभ्यास करण्याचे आवाहन केले. वेळेचे योग्य नियोजन, शिस्त, सातत्य आणि मेहनत ही यशाची महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
डॉ. एल. बी. पाटले यांनी इलेक्ट्रॉनिक्स विभागाची ओळख करून देत विभागातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी केले जाणारे प्रयत्न आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयातील संधी यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम यू. गाडगीळ मॅडम यांनी केले ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शीतल कुमावत मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहभागातून हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

No comments