वाघोळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा! विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा मलकापूर प्रतिन...
वाघोळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!
विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
मलकापूर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर : तालुक्यातील वाघोळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघोळा येथील रहिवासी श्री. काशिनाथ एकनाथ बावस्कार यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
तक्रारीनुसार, वाघोळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी दिनांक ११ ऑगस्ट २०२६ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी निवेदने व तक्रारी देण्यात आल्या होत्या. तसेच कार्यालयीन जावक क्रमांक २६४८/२६ अन्वये दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, संबंधित प्रकरणात ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.विस्तार अधिकाऱ्यांनी दिनांक व जावक क्रमांक नसलेला सदोष चौकशी अहवाल दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित अहवालात प्रत्यक्ष चौकशी न करता केवळ देयकांच्या रकमेप्रमाणे बिले असल्याचे नमूद करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीतील कामांची प्रत्यक्ष पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामावरही प्रश्नचिन्ह
गावात पाणीपुरवठ्यासाठी फिल्टर बसविण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गुणवत्ता व प्रत्यक्ष खर्च यांची तपासणी करण्यात यावी, तसेच संबंधित कामांचे मोजमाप पुस्तक, कामाची बिले आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, निवेदनात नमूद केलेल्या प्रत्येक कथित गैरव्यवहाराची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी कॅमेऱ्यासह चौकशी करण्यात यावी. चौकशीपूर्वी तक्रारदाराला चार दिवस आधी कळविण्यात यावे आणि चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि तक्रारीतील मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी कधी सुरू होते, याकडे वाघोळा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



No comments