उसाला प्रतिटन ५ हजार रुपयांचा भाव द्या ; छावा संघटनेचा इशारा दुष्काळात चारा छावण्या उभारण्याचीही मागणी. लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) ...
उसाला प्रतिटन ५ हजार रुपयांचा भाव द्या ; छावा संघटनेचा इशारा दुष्काळात चारा छावण्या उभारण्याचीही मागणी.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
[संपादक हेमकांत गायकवाड]
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जात आहे. खरीप पिकांचे नुकसान, उत्पन्नाची घट आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा उरलेला नाही. शेतीच्या उत्पादनात घट होत असताना शेतीवरील खर्च मात्र कायम आहे. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असून, शेतकरी आणि पशुधन दोघांचेही अस्तीत्व संकटात सापडले आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करू नये, अशी भूमिका साळुंके यांनी निवेदनातून मांडली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पशुधनासाठी चारा आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीच्या उपाययोजना मिळणार का, याकडे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाचे नियोजन कुठे?
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी गावोगावी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे. केवळ आश्वासनांवर शेतकऱ्यांचे संकट दूर होणार नाही; प्रत्यक्ष मदत आणि प्रभावी नियोजनाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

No comments