अघोषित लोडशेडींगमुळे निंभोरा वाघोदा अंधारात, महावितरणच्या भोंगळ कारभाराने चोरट्यांना रान मोकळे! मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत ग...
अघोषित लोडशेडींगमुळे निंभोरा वाघोदा अंधारात, महावितरणच्या भोंगळ कारभाराने चोरट्यांना रान मोकळे!
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक निंभोरा बु सह अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित आणि अनियमित भारनियमनामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणचे वीज कर्मचारी आणि वितरण विभागात समन्वय नसल्याने गावावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून संध्याकाळी ७ ते मध्यरात्री १२:३० पर्यंत सलग सव्वापाच तास वीज गायब होती. दि. १० रोजी पुन्हा त्याच वेळी संध्याकाळी ७ वाजता लाईट बंद झाली. विशेष म्हणजे आजूबाजूच्या गावात वीज सुरळीत असताना केवळ निंभोरा बु.मोठा वाघोदा बुद्रुक येथेच अघोषित लोडशेडींगमुळे बत्ती गुल का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
*उपअभियंत्याचे बेजबाबदार उत्तर, तर १३२ सब स्टेशनचा मोबाईल कायम बंद*
याबाबत उपअभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी _"लाईट वरुन गेली आहे, कधी येईल सांगता येणार नाही"_ असे अत्यंत बेजबाबदार उत्तर देऊन हात झटकले.
त्याहून गंभीर बाब म्हणजे १३२ केव्ही सब स्टेशनचा अधिकृत मोबाईल क्रमांक नेहमीच बंद (स्विच ऑफ) असतो. ऐन आणीबाणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क करायचा कुणाशी? हा सवाल उपस्थित होत आहे. तक्रार करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेत आहेत.
बँक, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन अंधारात - चोऱ्यांना निमंत्रण
निंभोरा हे मोठे गाव असून येथे बँक, पोलीस दुरक्षेत्र आणि रेल्वे स्थानक आहे. सततच्या अंधारामुळे या ठिकाणांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी आधीच हैराण आहे, त्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पशुधन, मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांना मोकळे रान मिळत असून नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागत आहे.
वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कार्यालयावर टाळे ठोकू आंदोलन करण्यात येईल, निंभोरा वासियांखकडून इशारा देण्यात आला आहे.

No comments