adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर; खरीप पीक पंचनाम्यांना वेग शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून कागदपत्रे तयार ठेवावीत; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे आवाहन

धरणगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर; खरीप पीक पंचनाम्यांना वेग शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून कागदपत्रे तयार ठेवावीत; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी या...

धरणगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर; खरीप पीक पंचनाम्यांना वेग

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून कागदपत्रे तयार ठेवावीत; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे आवाहन


विकास पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


धरणगाव : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने धरणगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या ट्रिगर-१ अंतर्गत धरणगाव तालुक्याचाही समावेश करण्यात आला असून, खरीप हंगाम २०२६ मधील शेती व फळपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात झाली असून, बाभुळगाव, सोनवद परिसरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी व तलाठ्यांकडून पाहणीला वेग आला आहे.

ग्राम महसूल अधिकारी गावोगावी भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. नुकसानीचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावयाचा असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंचनाम्यासाठी कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन

पंचनामा प्रक्रियेत विलंब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आधीच तयार ठेवाव्यात. यामध्ये आधारकार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच झेरॉक्सवर स्पष्टपणे मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. संयुक्त खाते असल्यास संबंधित ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देखील तयार ठेवावे.

ई-पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे

दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी ई-पीक पाहणी अर्थात पीक नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पीक नोंदणीअभावी शासकीय मदतीच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

“धरणगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून सरसकट पंचनामे सुरू आहेत. सर्व शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करून घ्यावी. तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित तलाठी अथवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून शासनाची मदत मिळण्याच्या प्रक्रियेत विलंब होणार नाही,” असे आवाहन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

पंचनाम्यांची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून संबंधित ग्राम महसूल अधिकारी व प्रशासनाला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments