आ.विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा ब्राह्मणगावात अनोखा देखावा! रेणुका कोल्हे यांच्यासह नवदुर्गांच्या आ...
आ.विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा ब्राह्मणगावात अनोखा देखावा!
रेणुका कोल्हे यांच्यासह नवदुर्गांच्या आगमनाची संकल्पना; २४ फूट लांबीच्या बसमध्ये देवीशक्ती, दुष्काळाचे वास्तव अन् जलसंवर्धनाचा संदेश
कोपरगांव / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून कोपरगांव आगारात दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसच्या संकल्पनेला नवरात्रोत्सवाचे आध्यात्मिक अधिष्ठान देत ब्राह्मणगांव येथील नवदुर्गा मित्र मंडळाने यंदा एक अनोखा आणि लक्षवेधी देखावा साकारला आहे.
आमदार विवेक कोल्हे आणि रेणुका कोल्हे यांच्या संकल्पनेशी जोडलेला हा देखावा म्हणजे देवीभक्ती, सामाजिक जाणीव आणि नावीन्यपूर्ण कलाकृतीचा सुंदर संगम ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच कोपरगांव तालुक्यात प्रथमच अशा स्वरूपात साकारण्यात आलेल्या या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, तो पाहण्यासाठी परिसरातून भाविक आणि नागरिकांची गर्दी होत आहे.
नवदुर्गा मित्र मंडळाने तब्बल २४ फूट लांब आणि ११ फूट उंचीची ‘राजमाता जिजाऊ’ बस हुबेहूब साकारली आहे. रस्त्याच्या कडेला प्रत्यक्ष बस उभी असल्याचा भास निर्माण करणारी ही कलाकृती येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना थांबून पाहण्यास भाग पाडत आहे. दसऱ्यापर्यंत हा देखावा नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
बसच्या संकल्पनेतून नवदुर्गांच्या आगमनाची कल्पक मांडणी
आमदार विवेक कोल्हे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव आगारात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसची दखल घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या बसला नवरात्रोत्सवाच्या संकल्पनेशी जोडले. आमदार विवेक कोल्हे आणि रेणुका कोल्हे हे नव्या बसमधून नवदुर्गांना आणण्यासाठी निघाले आणि त्या नवदुर्गांचे ब्राह्मणगांवात आगमन झाले, अशी कल्पक संकल्पना या देखाव्यातून साकारण्यात आली आहे. त्यामुळे बस ही केवळ वाहतुकीचे साधन न राहता देवीशक्तीच्या आगमनाचे प्रतीक बनली आहे.
खिडक्यांमध्ये देवीशक्तीचे दर्शन
या देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बसच्या प्रत्येक खिडकीतून साकारण्यात आलेले देवीदर्शन. महाराष्ट्रातील विविध देवीस्थानांसह चांदवड येथील रेणुका माता, कालिका माता, कोटमगावची जगदंबा माता आणि ब्राह्मणगावची रेणुका माता अशा देवीस्वरूपांचे दर्शन खिडक्यांमधून घडविण्यात आले आहे. एकूण आठ देवीस्वरूपांची खिडक्यांमध्ये मांडणी करण्यात आली असून, नवव्या देवीस्वरूपाची स्थापना वैष्णोदेवीच्या प्रतिमेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण बसला भक्तिमय आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
दुष्काळाच्या वेदनेतून साकडे; जलसंवर्धनाचा संदेश
केवळ धार्मिक देखावा साकारण्यापुरते मंडळाचे प्रयत्न मर्यादित राहिलेले नाहीत. महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या दुष्काळी संकटाचे वास्तवही या बसमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेला बळीराजा, शेतमजूर, व्यापारी, पशुपक्षी, झाडे आणि फुले यांना या संकटातून तारावे, यासाठी देवीचरणी साकडे घालण्यात आल्याचे चित्रण केले आहे.
बसच्या मागील बाजूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार विवेक कोल्हे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यासोबतच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे श्रद्धेबरोबरच पाण्याचे महत्त्व आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची गरज अधोरेखित होत आहे.
बसच्या क्रमांकातही दडली संकल्पना !
या देखाव्यातील बसचा क्रमांकही मंडळाने विचारपूर्वक निवडला आहे. ‘MH 17 RV 1120’ या क्रमांकातील ‘R’ म्हणजे रेणुका, ‘V’ म्हणजे विवेक, तर ‘11’ ही घटस्थापनेची तारीख आणि ‘20’ हा दसऱ्याचा दिवस, असा त्यामागील संकल्पनात्मक अर्थ मांडण्यात आला आहे. त्यामुळे देखाव्यातील प्रत्येक तपशीलामागे नवरात्रोत्सवाशी जोडलेली कल्पकता दिसून येते.
कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून साकारली कलाकृती
नावीन्यकलाकृती संकल्पना, आकर्षक सजावट, देवीस्वरूपांचे दर्शन आणि सामाजिक संदेश यांमुळे ब्राह्मणगांवातील नवदुर्गा मित्र मंडळाचा हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे.
मंडळाचे अध्यक्ष योगेश नरोडे, उपाध्यक्ष अमोल आहेर, अर्जुन नरोडे, कृष्णा दोडे, सुनील वाकचौरे, रोशन मंडलिक, किरण कुमावत, किरण साळवे, आदित्य भुजाडे, विवेक भुजाडे, कैलास पगारे, गंगाराम बनकर, संतोष भोसले, अमित वाकचौरे, आशिष वाकचौरे, अमोल येवले, रवी कडवे, प्रकाश कडवे, नाना शिंदे, वैभव शिंगाडे, अभि लोखंडे तसेच ग्रामस्थांनी या देखाव्यासाठी परिश्रम घेतले.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साकारलेली ही ‘राजमाता जिजाऊ’ बस केवळ देखण्या सजावटीचे उदाहरण नसून, श्रद्धा, कल्पकता, स्थानिक देवीपरंपरा आणि जलसंवर्धनाचा संदेश एकाच ठिकाणी देणारा उपक्रम ठरत आहे. दसऱ्यापर्यंत हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी ब्राह्मणगावात आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वृत्त विशेष सहयोग
रोशन मंडलिक - ब्राह्मणगांव
वृत्त विशेष सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments