त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याचा हल्ला! चौथीत शिकणारा रोहित वाडघे गंभीर जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाघेरा गावालगतच्या राजवीर पाडा य...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याचा हल्ला! चौथीत शिकणारा रोहित वाडघे गंभीर जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वाघेरा गावालगतच्या राजवीर पाडा येथे बिबट्याचा बालकावर हल्ला; वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावालगत असलेल्या राजवीर पाडा येथे बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता चौथीत शिकणारा रोहित लालू वाडघे हा आपल्या आजीसोबत शेतावर जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी रोहितला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
*बिबट्याचा लोकवस्तीत वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*
गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर थेट लोकवस्तीपर्यंत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असतानाही वन विभागाकडून वेळीच ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात, अशी नाराजीही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांना दिवसा शेतावर जातानाही जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शेतीची कामे करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती सतत मनात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील काही वर्षांतही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभागाने केवळ घटनास्थळी भेट देण्यापुरती कार्यवाही न करता कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
वन विभागाने तातडीने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून परिसरातील वनक्षेत्र आणि बिबट्याचा संभाव्य वावर असलेल्या भागाची पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत. तसेच वन विभागाच्या पथकाने परिसरात नियमित गस्त घालून ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


No comments