adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्वानदंश टाळण्यासाठी सजगता हाच पहिला बचाव! मुकुंदराज विद्यालयात विद्यार्थ्यांना रेबीज प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

श्वानदंश टाळण्यासाठी सजगता हाच पहिला बचाव! मुकुंदराज विद्यालयात विद्यार्थ्यांना रेबीज प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन लातूर, दि. ०७ (उत्तम माने) [स...

श्वानदंश टाळण्यासाठी सजगता हाच पहिला बचाव!

मुकुंदराज विद्यालयात विद्यार्थ्यांना रेबीज प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन


लातूर, दि. ०७ (उत्तम माने)

[संपादक-हेमकांत  गायकवाड]

रस्त्यावर किंवा परिसरात आढळणाऱ्या श्वानांपासून सुरक्षित राहणे, श्वानदंश टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आणि दंश झाल्यास वेळ न दवडता वैद्यकीय उपचार घेणे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे मुकुंदराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. दगडू लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे प्रवक्ते डॉ. पवन देवकाते यांनी विद्यार्थ्यांना श्वानदंश प्रतिबंध आणि रेबीज या गंभीर आजाराबाबत मार्गदर्शन केले.

श्वान दिसताच घाबरून पळणे, त्यांना चिडवणे, दगड मारणे किंवा त्यांच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न करणे टाळावे. अनोळखी श्वानांपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच श्वान खात असताना, झोपलेला असताना किंवा पिल्लांसोबत असताना त्याला त्रास देऊ नये, असे आवाहन डॉ. देवकाते यांनी केले. श्वानांच्या हालचालींकडे लक्ष देणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, लहान मुलांनी अनोळखी श्वानांच्या संपर्कात येताना विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

श्वानदंश झाल्यानंतर जखमेकडे दुर्लक्ष करणे अथवा केवळ घरगुती उपचारांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी जखमेची जागा साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. त्यानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यकतेनुसार इम्युनोग्लोब्युलिन घेणे महत्त्वाचे आहे. जखमेवर मिरची, हळद, तेल किंवा अन्य पदार्थ लावू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेबीज हा विषाणूमुळे होणारा गंभीर आजार असून, लक्षणे दिसू लागल्यानंतर तो जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. मात्र, श्वानदंशानंतर त्वरित योग्य उपचार घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. त्यामुळे श्वानदंश झालेल्या व्यक्तीने लक्षणे दिसण्याची वाट न पाहता तातडीने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे, असे डॉ. देवकाते यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्यासोबतच श्वानदंश प्रतिबंध आणि रेबीजबाबत मिळालेली माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. योग्य माहिती, सतर्कता आणि वेळेवर उपचार यांच्या माध्यमातून श्वानदंशामुळे होणारे धोके कमी करता येतात, हा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.

‘श्वानदंश टाळण्यासाठी सजगता आणि दंशानंतर त्वरित उपचार हीच रेबीजपासून बचावाची प्रभावी गुरुकिल्ली आहे,’ असा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

No comments