जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर 'मराठी अभिजात भाषा सप्ताह' निमित्त कवी जयंत बोदडे यांचा सत्कार... प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक ...
जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर 'मराठी अभिजात भाषा सप्ताह' निमित्त कवी जयंत बोदडे यांचा सत्कार...
प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर: जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी अभिजात भाषा गौरव सप्ताहाचे औचित्य साधून एका विशेष साहित्यिक भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध कवी जयंत बोदडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. कार्यक्रम आयोजक एस. आर. ठाकूर यांनी कवी जयंत बोदडे यांचा उपस्थितांना सविस्तर परिचय करून दिला. याप्रसंगी कवी जयंत बोदडे यांनी आपल्या रसाळ भाषेत काव्यवाचन करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी स्वतःच्या साहित्य प्रवासाविषयी आणि मराठी भाषेच्या समृद्धीविषयी विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली. तसेच, त्यांच्या प्रसिद्ध 'मांडूळ' कथासंग्रहाविषयी सांगून, 'बाई आणि कविता' या संग्रहातील काही निवडक कवितांचे सुंदर सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे कवी जयंत बोदडे यांनी लिहिलेली 'घुंगराची गाडी' आणि 'मांडुळ' ही पुस्तके विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांच्या हस्ते शाळेच्या ग्रंथालयासाठी भेट म्हणून देण्यात आली. विविध पुरस्कारांनी सन्मानित कवी जयंत बोदडे यांचा प्राचार्य यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य व्ही एम चौधरी यांनी मराठी भाषेची महती आणि तिचे वैभव विशद करत विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. याच सप्ताहाचे औचित्य साधून एस. एस. कोलते मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा घेतली.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक छान आणि दर्जेदार कविता सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप सर्वांचे आभार मानून अत्यंत उत्साही वातावरणात झाला.

No comments